इस्रायलपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श !
‘शत्रूला कात्रीत पकडल्यावर उगाच मोठेपणा दाखवून त्याला क्षमा करणे, याइतका दुसरा मूर्खपणा नाही. युद्धात ‘मारा किंवा मरा’ इतकाच पर्याय असतो. चारही बाजूंनी शत्रूने घेरलेल्या आपल्या स्वराज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूवर दया न दाखवण्याचे जे धोरण स्वीकारले, त्यामुळेच हिंदवी स्वराज्य टिकू शकले. हिंदवी स्वराज्याप्रमाणेच इस्रायलही चारही बाजूंनी शत्रूने घेरलेला असल्याने इस्रायलने छत्रपती शिवाजी महाराज यांचाच आदर्श ठेवला असून ‘हमास’बरोबर युद्धबंदीची शक्यता फेटाळून लावली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
१. इस्रायली बाण्यापुढे हमास हतबल !
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘गाझा पट्टीत युद्धबंदी होणार नाही’, असे घोषित केल्यामुळे ‘हमास’चा जीव टांगणीला लागला आहे. इस्रायलने आता गाझा पट्टीत प्रत्यक्ष भूमीवरून आक्रमण चालू केले असून इस्रायली रणगाडे आणि लढाऊ विमाने यांनी गाझा पट्टीची राखरांगोळी करण्यास प्रारंभ केला आहे. या आक्रमणात प्रामुख्याने हमासची ठिकाणे आणि भुयारे यांचे जाळे नष्ट करण्यावर भर देण्यात आला आहे. काही दिवसांतच संपूर्ण गाझा पट्टीवर इस्रायली सैन्याची पकड बसेल आणि मग पळण्याचे मार्गही बंद होतील, याची पूर्ण कल्पना हमासला आली आहे. म्हणूनच आता आणखी काही परदेशी ओलिसांना मुक्त करण्याची सिद्धता हमासने दर्शवली आहे; पण इस्रायली नेतृत्व हमासचे कोणतेही म्हणणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाही, किंबहुना हमासने आता सर्वच्या सर्व इस्रायली ओलिसांची जरी मुक्तता केली, तरी हमासच्या विरोधातील इस्रायलची कारवाई चालूच राहील, हे इस्रायलच्या सध्याच्या धोरणावरून स्पष्ट होत आहे.
‘हमासला पूर्णपणे नष्ट केल्यावरच आम्ही शांत बसू’, हे इस्रायलने यापूर्वीच घोषित केले आहे; पण ‘बीबीसी’, ‘सी.एन्.एन्.’, ‘अल्-जझिरा’ इत्यादी हमासप्रेमी वृत्तवाहिन्यांनी इस्रायलच्या आक्रमणांमध्ये उद़्ध्वस्त होणारी रुग्णालये, इमारती, सैरावैरा धावणारे नागरिक, अनाथ आणि घायाळ बालके वगैरेंची छायाचित्रे अन् व्हिडिओ प्रसिद्ध करून ‘इस्रायल म्हणजे राक्षस आहे’, असे जो चित्र उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्यास इस्रायल काडीचीही किंमत देत नाही.
२. युद्धबंदी करण्याचा सल्ला हमासला का नाही ?
‘इस्रायलने युद्धबंदी करावी’, असा सल्ला देणारे हाच सल्ला हमासला का देत नाहीत ? ‘हमासने सर्व ओलिसांची सुटका करावी’, असे ते का सांगत नाहीत ? हमासने आतापर्यंत केवळ ४ ओलिसांची मुक्तता केली असून त्यांतील २ अमेरिकी आणि अन्य २ परदेशी आहेत. एकाही इस्रायली ओलिसाची मुक्तता हमासने केलेली नाही. याखेरीज हमासकडून आताही इस्रायलवर रॉकेट्सचा मारा चालूच आहे. त्यांचे नेतेही रुग्णालये, शरणार्थींच्या छावण्या आणि नागरी वस्त्या, यांमध्येच आश्रय घेत आहेत. इस्रायलकडे अनाठायी मानवता नसल्याने तो या ठिकाणांवर बिनदिक्कत आक्रमणे करत आहे. भारताने इस्रायलचा आदर्श समोर ठेवला असता, तर आजवर जे सहस्रो निरपराध नागरिक आतंकवादाला बळी पडले, ते वाचले असते.
भारतानेही आजवर पाकिस्तानशी ४ युद्धे केली. प्रत्यक्ष युद्धात जरी भारताने विजय मिळवला असला, तरी राजनैतिक विजयापासून तो नेहमीच दूर राहिला. वर्ष १९६५ मधील युद्धात जर तत्कालीन नेतृत्वाने ऐन मोक्याच्या वेळी अवसानघातकीपणा केला नसता, तर पाकव्याप्त काश्मीर आज भारतात असते. भारतीय सैन्य लाहोरच्या वेशीवर धडका मारत होते. केवळ २ दिवसांत लाहोर भारतीय सैन्याच्या हाती पडले असते; पण तेव्हा तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी युद्धबंदीची घोषणा केली आणि भारतीय सैन्याला हात हलवत परत यावे लागले. त्यांना लाहोरपर्यंतच्या भागावरील नियंत्रण कायम ठेवण्यास सांगण्यात आले नाही. पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही तसाच भिजत पडला. पुन्हा वर्ष १९७१ मधील युद्धातही बांगलादेश स्वतंत्र केल्यानंतर झालेल्या तहात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेखही इंदिरा गांधी यांनी केला नाही. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानचे एक लाख सैनिक (युद्धबंदी) विनाअट सोडून दिले. ‘क्रॉनिक’ म्हणजे ‘जुनाट आजार’. हा वारंवार डोके वर काढतो आणि प्रत्येक वेळी अधिक त्रासदायक ठरतो. भारतानेही पाकिस्तान नामक जुनाट रोगावर जालीम उपाय न योजल्याने आतंकवादाचा आजार बळावत गेला आहे.
३. स्वतंत्र भारतातील नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून काहीच बोध घेतला नाही !
पृथ्वीराज चौहानने जी चूक केली, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केली नाही. शत्रूला कधीच जिवंत सोडायचे नसते, ही रणनीती छत्रपती शिवाजी महाराज यांनी सदैव अवलंबली. त्यांचे सेनापती प्रतापराव गुजर यांनी हे धोरण न स्वीकारता बहलोल खानाला सोडून दिल्याने त्यांना महाराजांचा रोष पत्करावा लागला होता. परिणामी, तिरीमिरीत ते केवळ ७ जणांसह शत्रूचा बीमोड करण्यासाठी घोड्यावरून निघाले आणि त्यावरच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गाणे आधारले आहे. शिवरायांनी अफझलखानाला मारले आणि शाहिस्तेखानालाही मारण्याचा प्रयत्न केला; पण त्याच्या सुदैवाने त्याचे जिवावरील संकट बोटांवर निभावले. त्यांच्या या नीतीमुळेच हिंदवी स्वराज्य केवळ स्थापनच झाले, असे नव्हे, तर ते भारतभर पसरले आणि भारताच्या भावी स्वातंत्र्ययुद्धाची प्रेरणा ठरले; पण दुर्दैवाने यातून स्वतंत्र भारतातील नेत्यांनी काहीच बोध घेतला नाही.
पाकिस्तान हा विश्वास ठेवण्यायोग्य देश नाही आणि त्याचे नेतेही दगाबाज आहेत, याचा पूर्ण अनुभव असतांना भारताने वारंवार या शत्रूवर दया दाखवली आहे. ती क्षमाशीलता वांझोटीच ठरली. पुढे कारगिलही घडले आणि नंतर मुंबईवरील २६/११ चे आतंकवादी आक्रमणही झाले. यासह इतरही अनेक आक्रमणे झाली. उरी आणि बालाकोटनंतर पाकिस्तान तुलनेने शांत आहे; कारण त्याला आता कळून चुकले आहे की, भारतावर पृथ्वीराज चौहानचा नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवणार्या नेतृत्वाचे राज्य आहे.
४. इस्रायल हमासचा पुरता बीमोड करीलच !
पृथ्वीराजप्रमाणे दिलदारपणा दाखवून हमासला आज क्षमा केली, तर उद्या ती संघटना दुप्पट शक्तीने इस्रायलवर तुटून पडेल. सुदैवाने इस्रायलमध्ये असे अवसानघातकी नेते नसल्यामुळेच त्याने गाझा पट्टीत व्यापक युद्ध छेडले आहे. हमासचा पुरता बीमोड केल्याविना ते संपुष्टात येणार नाही. युद्धबंदी हा पर्यायच इस्रायलपुढे नाही.’
– राहुल बोरगांवकर
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, १.११.२०२३)