‘एक दिवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी’ अभियान
आसगे (लांजा) येथे तरुणांनी केली १००१ दिव्यांची मनमोहक आरास
लांजा – दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास. विद्युत् दिव्यांच्या आरासीऐवजी नैसर्गिक दिव्यांची आरास सगळ्यांनाच मनमोहक वाटते. मनाला आल्हाददायक वाटते. मन शांत आणि प्रसन्न करते. अशाच प्रकारे दिव्यांची सुंदर आरास छत्रपती शिवाजी महाराज चौक, आसगे येथील तरुणांनी पहिल्यांदाच केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आपण दिवाळी साजरी करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा म्हणून ‘एक दिवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी’ या अभियानांतर्गत वरील दीपोत्सव साजरा करण्यात आला होता.
या दीपोत्सवात १००१ दिव्यांची आरास करण्यात आली होती. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील अनेक नागरिक ही आरास बघण्यासाठी उपस्थित झाले होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने घरोघरी आरास केली होती. तथापि ‘सामूहिकपणे आपण आरास करूया’, असा विचार येथील तरुणांनी केला आणि या विचाराला त्यांनी मूर्त स्वरूप दिले. तरुणांनी एकत्र येऊन मनमोहक दिव्यांची आरास केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.