गेले १२ महिने पृथ्वीतलावर नोंदवण्यात आलेले सर्वांत उष्ण महिने !
नवी देहली – नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ हा कालखंड पृथ्वीतलावर नोंदवण्यात आलेल्या तापमानातील सर्वांत उष्ण तापमानाचा काळ होता. कोळसा, नैसर्गिक वायू, तसेच इतर इंधनाच्या ज्वलनामुळे पृथ्वीचे तापमान वाढवणारे कार्बनडाय ऑक्साईडसारखे वायू बाहेर पडत आहेत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहेत, असा निष्कर्ष ‘क्लायमेट रिसर्च’ या समाजसेवी विज्ञान संशोधन संस्थेकडून करण्यात आलेल्या अभ्यासात मांडण्यात आला.
या वर्षभरात पृथ्वीवरील ९० टक्के लोकसंख्येला किमान १० दिवस अतीउष्ण दिवसांचा अनुभव आला. हे प्रमाण सामान्य तापमानापेक्षा तब्बल ३ पट अधिक असल्याचीही नोंद झाली. या काळात सरासरी जागतिक तापमानाची १.३ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. ‘पॅरिस करारा’नुसार जागतिक स्तरावर सगळ्यांनीच मान्य केलेल्या १.५ अंश सेल्सिअस मर्यादेच्या हे अगदी जवळ पोचले आहे.
१. ‘क्लायमेट सेंट्रल’चे वैज्ञानिक अँड्र्यू पर्शिंग यांनी म्हटले की, लोकांना हे ठाऊक आहे की, गोष्टी फार विचित्र झाल्या आहेत; पण त्या का विचित्र झाल्या आहेत?, हे मात्र लोकांना समजत नाही; कारण ते वास्तवाकडे बघत नाहीत. आपण अजूनही कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू जाळत आहोत.
२. कोलंबिया विद्यापिठातील हवामान तज्ञ जेसन स्मरडॉन यांनी सांगितले की, मला वाटते यावर्षी समोर आलेल्या आकडेवारीतून एक गोष्ट ठळकपणे समोर आली असून ती म्हणजे कुणीच सुरक्षित नाही. प्रत्येकाला वर्षभरात कधी ना कधी असामान्य अशी उष्णता अनुभवायला मिळाली आहे. हे म्हणजे ‘आपण सरकत्या जिन्यावर उभे रहायचे आणि आश्चर्य व्यक्त करायचे की, आपण वर कसे जात आहोत ?’, या प्रकारतले आहे. सगळ्यांना कल्पना आहे की, जागतिक तापमानवाढ होत आहे. गेल्या काही दशकांपासून त्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.
३. वॉशिंग्टन विश्वविद्यालयातील ‘सेंटर फॉर हेल्थ अँड ग्लोबल एन्व्हायर्नमेंट’चे प्राध्यापक किस्टी एबी यांनी चिंता व्यक्त करतांना म्हटले की, आपण पालटत्या परिस्थितीत स्वत:च्या जीवनशैलीत पालट करून येणार्या संकटासाठी आधीपासूनच सिद्ध रहायला हवे; कारण जागतिक तापमान वाढीचा परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दिसत आहे.
जागतिक तापमान वाढत असल्याची लक्षणे !
१. तापमान वाढल्यामुळे पावसाचे पावसाचे प्रमाणे वाढले आहे. उष्ण तापमानात हवेतील बाष्प अधिक प्रमाणात धरून ठेवले जाते. त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा अनेकदा वादळाची स्थितीही निर्माण होते. आफ्रिकेतील अशाच वादळामुळे किमान ४ ते ११ सहस्र लोकांचे बळी गेले आहेत.
२. ब्राझिलमध्ये दुष्काळात नद्या इतिहासात कधीच नव्हत्या इतक्या कोरड्या पडल्या आहेत.
३. अमेरिकेत या वर्षभरात ३८३ लोकांचा हवामानातील जीवघेण्या पालटामुळे मृत्यू झाला. त्यातले ९३ मृत्यू हे एकट्या ‘माऊई’ वणव्यामुळे (अमेरिकेतील गेल्या १०० वर्षांतला सर्वांत भीषण वणवा) झाले.
४. कॅनडामध्ये प्रत्येक २०० लोकांमध्ये एका व्यक्तीने वणव्यामुळे स्वतःचे घर सोडले आहे. अधिक काळ चालणार्या उष्ण वातावरणामुळे हे वणवे दीर्घकाळ पेटते रहातात.
संपादकीय भूमिकाजगाची उष्णता वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांतील प्रमुख कारण विज्ञान हे आहे. विज्ञानाचा उदोउदो होण्यापूर्वी पृथ्वी आणि त्यावरील निसर्ग सुरक्षित होते. आता पृथ्वी विनाशाच्या दिशेने जलद गतीने जात आहे. |