‘टायगर ३’ चित्रपट पहातांना प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच १० मिनिटे फटाके फोडले !

  • मालेगाव येथील चित्रपटगृहातील प्रकार !

  • रॉकेट उडवले

  • अग्निशमन दलाला बोलवावे लागले

मालेगाव – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, म्हणजे १२ नोव्हेंबर या दिवशी अभिनेते सलमान खान यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. खान यांच्या चाहत्यांनी येथील मोहन चित्रपटगृहात थेट फटाके फोडले. या वेळी रॉकेट उडवण्यात आले, तसेच बाँब, फुलझडी आदी फटाकेही फोडण्यात आले. जवळपास १० मिनिटे हा प्रकार चालू होता. काही प्रेक्षक शिट्या वाजवून नाचत या सर्वांचे समर्थन करत होते. यामुळे चित्रपटाचा खेळ मध्येच बंद करावा लागला. या चित्रपटगृहापासून छावणी पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे.

घटनेची माहिती मिळताच रात्री ११.३० वाजता पोलीस चित्रपटगृहात आले.काही वेळाने अग्निशमन दलाचा बंबही तेथे पोचला. प्रचंड गर्दी झाल्याने फटाके फोडणार्‍या संशयितांना ओळखणे अशक्य झाले. काही प्रेक्षक आधीच चित्रपटगृहाबाहेर पडले होते. हुल्लडबाजी टाळण्यासाठी शेवटी खेळ बंद करण्यात आला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अद्याप कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

संपादकीय भूमिका

  • चित्रपट अभिनेत्यांचे आदर्श समोर ठेवून बेशिस्त वर्तन करणार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !
  • आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्यानेच सामाजिक मालमत्तांच्या ठिकाणीही कसे वागावे ?, याचे जनतेला ज्ञान नाही !