Exclusive : एस्.टी. महामंडळाच्या मुख्य इमारतीचा भाग ढासळला !
बांधकामाचा प्रस्ताव ८ वर्षांपासून रखडला !
मुंबई, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – मुंबई सेंट्रल येथे असलेले एस्.टी. महामंडळाचे मुख्यालयाचे काही बांधकाम अक्षरश: ढासळले आहे. इमारतीच्या तळमजल्यापासून ते शेवटच्या चौथ्या मजल्यापर्यंत ठिकठिकाणी इमारतीचे बांधकाम तुटले आहे. गंभीर स्थिती असूनही मागील ८ वर्षांपासून या इमातीच्या बांधकामाचा प्रस्ताव रखडला आहे.
वर्ष २०१६ मध्ये एस्.टी.च्या मुख्यालयाच्या नूतनीकरणाचा ५५० कोटी रुपयांचा प्रस्ताव सिद्ध करण्यात आला होता. या इमारतीचा आराखडाही सिद्ध करण्यात आला. इमारत स्वत: बांधून त्यामधील काही मजले भाड्याने देण्याचे निश्चित करण्यात आले. राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे सरकारच्या काळात दिवाकर रावते परिवहनमंत्री असतांना हा प्रस्ताव अंतिमही करण्यात आला. त्यानंतर इमारतीच्या बांधकामासाठी एकदा निविदाही काढण्यात आल्या; मात्र या निविदा रहित करण्यात आल्या. त्यानंतर अद्याप याविषयी गतीने कार्यवाही झालेली नाही.
भाडेतत्त्वाचे धोरण अद्यापही अनिश्चित !
नवीन इमारतीमधील सदनिका भाड्याने देतांना ३० वर्षांसाठी द्याव्यात कि ६० वर्षांसाठी द्याव्यात ? याविषयी मतांतरे आहेत. अनेक मास होऊनही याविषयीचे धोरण निश्चित करण्यात आलेले नाही.
… तर उत्तरदायी कोण ?या इमारतीमध्ये एस्.टी. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांपासून महाव्यवस्थापक आदी मुख्य अधिकारी, तसेच अनेक कर्मचारी काम करत आहेत. भविष्यात दुर्घटना घडून कुणाच्या जीविताची हानी झाल्यास उत्तरदायी कोण ?, असा प्रश्न निर्माण होत आहे. |