Exclusive : मुख्य बाजारपेठेत कचरा रस्त्यावर फेकला जातो, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष !
‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई उपक्रमा’चे तीनतेरा !
मुंबई, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई’ उपक्रमाची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात मुंबईतील दुकानदार शहराला अस्वच्छ करण्याचे काम करत आहेत. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या दादर येथील दुकानदार दुकानातील टाकाऊ साहित्य रस्त्यावर फेकतात. यामुळे दादरच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. दुकानदारांच्या या असभ्यपणामुळे महानगरपालिकेच्या झाडूवाल्यांना सकाळी हा कचरा स्वच्छ करण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागत आहे. हा किळसवाणा प्रकार उघडपणे चालू असूनही कचर्याचे व्यवस्थापन पहाणार्या महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दुकानांतील कचरा एकत्र करून दुकानाच्या बाहेर ठेवल्यास स्वच्छता कर्मचार्यांना कचरा घेणे सोपे होईल. दुकानदार मात्र कचरा रस्त्यावर टाकतात. चपलांचे खोके, कपड्यांचे खोके, कागदांचे बोळे आदी दुकानांतील कचरा मुख्य रस्त्यावर टाकला जातो. रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या दादरच्या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर झाडूवाले येईपर्यंत हा कचरा साचलेला असतो. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार नियमितचा झाला आहे. दादर हे मुंबईचे मुख्य केंद्र असल्यामुळे भारतासह विदेशातील नागरिकही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात. दादर बाजारपेठेतील अस्वच्छतेमुळे त्यांच्यापुढे मुंबईचे ‘अस्वच्छ शहर’ असे चित्र समोर येत आहे.
तक्रार करण्यासाठीचा हेल्पलाईन क्रमांक बंद !मुंबईतील अस्वच्छतेविषयी तक्रार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई’ या नावाने ८१६९६ ८१६९७ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले; मात्र हा क्रमांक बंद आहे. ‘हा क्रमांक इनव्हॅलिड आहे’, असे सांगितले जाते. या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क केला असता ‘या क्रमांकावर व्हॉट्सअॅपवरून संपर्क होऊ शकत नाही’, असा संदेश येतो. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने याविषयी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्याशी दूरभाषद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. संपादकीय भूमिकाहा आहे मुंबई प्रशासनाचा भोंगळ कारभार ! |
संपादकीय भूमिकाशासन-प्रशासनाने लोकपयोगी उपक्रम राबवले, तरी त्यांच्या यशस्वितेचे दायित्व हे केवळ त्यांचे नाही, तर लोकसहभागातूनच ते साध्य होऊ शकते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष हे गंभीर सूत्र आहेच; परंतु त्यासमवेतच रस्त्यावर कचरा टाकणार्या दुकानदारांनाही समज दिली गेली पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य कारवाई होणेही तेवढेच आवश्यक आहे ! |