तिरस्कारी काँग्रेस !
वर्ष २०१४ मध्ये देशातील जनतेने काँग्रेसला केंद्रीय सत्तेतून हटवले. याला ९ वर्षे उलटून गेली आहेत; मात्र यातून काँग्रेसने धडा घेतलेला दिसत नाही. गेल्या ९ वर्षांत ‘भारत काँग्रेसमुक्त’ करण्याच्या घोषणा दिल्या जात असतांना अजूनही काँग्रेसमध्ये जीव आहे. तिची धडधड अद्यापही चालू आहे. याला वेगवेगळी कारणे असली, तरी ‘काँग्रेसमुक्त भारत’ झालाच पाहिजे. एक काळ असा होता की, ‘ब्रिटनच्या सत्तेचा सूर्य कधीच मावळत नाही’, असे म्हटले जात होते; मात्र आज ब्रिटनही त्याच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचे चित्र आहे. भारत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून पुढे गेला आहे. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारत झाल्याविना रहाणार नाही. ५०० वर्षांपूर्वी अयोध्येत मोगल आक्रमक बाबर याने श्रीरामाचे भव्य मंदिर पाडून तेथे बाबरी उभी केली. तीही नष्ट झाली. तेथे आता पुन्हा भव्य श्रीराममंदिर उभे रहात आहे. या राममंदिराच्या उभारणीत काँग्रेस काळ्या मांजरासारखी गेली ७० वर्षे आडवे जात होती. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसने राममंदिराला विरोध केला. न्यायालयात राममंदिराचा निर्णय येऊ नये, म्हणून आटापिटा केला; मात्र शेवटी विजय रामभक्तांचाच झाला. अशा या काँग्रेसची सत्य स्थिती त्यांच्याच पक्षाचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी उघड केली. ‘आमच्या पक्षातील काही नेते श्रीराम आणि श्रीराममंदिर यांचा तिरस्कार करतात’, असे त्यांनी उघड सांगितले. काँग्रेसच्याच नेत्याने हे स्पष्टपणे सांगितल्याने ते अधिकृत झाले, असेच म्हणावे लागेल. अशा काँग्रेसला हिंदु पुनःपुन्हा निवडून देऊन काही राज्यांत सत्तेत बसवून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत. फुकट मिळणार्या गोष्टींसाठी फसून हिंदू काँग्रेसच्या नरकासुराला जिवंत ठेवण्याचे पाप करत आहेत. प्रमोद कृष्णम् यांच्या विधानावर काँग्रेसवाल्यांनी मौन साधले आहे. एकीकडे श्रीराम वनवास भोगून अयोध्येत परतल्याचा आनंद म्हणून दिवाळी साजरी होत आहे, तर दुसरीकडे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असणार्या श्रीरामाविषयी काँग्रेसवाल्यांची दूषित मानसिकता उघड होत असतांना त्यांचे मात्र मौन आहे. अशा काँग्रेसवाल्यांचा उघड विरोध करण्यास अद्यापही कुणी सिद्ध नाही, असेच चित्र दिसत आहे. काँग्रेस आणखी किती वर्षे प्रभु श्रीरामाचा द्वेष करणार आहे ? जेथे रावण, कुंभकर्ण, मेघनाद, मारिच आदी असुर श्रीरामांसमोर टिकू शकले नाहीत, तेथे काँग्रेस कधीतरी टिकू शकेल का ? याचा विचार काँग्रेसवाले कधी करणार आहेत ? सध्या काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत, तर पुढे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या वेळी हिंदूंनी काँग्रेसला राममंदिरावरून प्रश्न विचारले पाहिजेत. काँग्रेसवाल्यांना सळो कि पळो केले पाहिजे !