श्री लक्ष्मीचे रक्षण करा !
देशातच नव्हे, तर विदेशात जेथे हिंदु रहातात, त्यांनी १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन केले. हिंदु संस्कृतीनुसार देवीतत्त्वाला विविध रूपांमध्ये पूजले जाते. वेगवेगळ्या गुणांसाठी वेगवेगळ्या देवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. विशेषतः देवीला शक्तीचे स्वरूप मानले जाते. ‘प्रत्येक स्त्रीमध्ये देवीतत्त्व आहे आणि त्याचा सन्मान केला पाहिजे’, असे हिंदु धर्मात सांगितलेले आहे. धन, समृद्धी आणि ऐश्वर्य यांसाठी श्री लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवात कन्या पूजन म्हणजेच कुमारिका पूजन केले जाते. घरात मुलगी जन्माला आली, सून आली की, तिला ‘लक्ष्मी’ मानले जाते; मात्र आज या देशात या लक्ष्मीरूपी मुलींवर अत्याचार होत आहेत आणि तिचे पूजन करणारे हतबल आहेत. ‘श्री लक्ष्मीदेवीने आपल्यावर प्रसन्न व्हावे’, असे प्रत्येकालाच वाटत असते; मात्र त्या प्रत्येकाने घरातील, समाजातील आणि देशातील लक्ष्मीचे रक्षण करण्यासाठी कृतीशील होणे आवश्यक आहे; पण तसे होतांना दिसत नाही. राजस्थानच्या दौसा येथे भूपेंद्र सिंह नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाने ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून भूपेंद्र याला पोलिसांच्या कह्यातून घेऊन चोपले. या घटनांच्या विरोधात चीड असली पाहिजे; मात्र अशा घटना घडूच नयेत; म्हणून जे प्रयत्न व्हायला हवेत, त्यासाठी समाजाने संघटित होऊन प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत देशात महिलांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याला विविध कारणे असली, तरी या घटना थांबवणे आवश्यक आहे. दौसामधील घटनेत आरोपीच पोलीस अधिकारी आहे. ‘ज्याने समाजाचे रक्षण करायला हवे, तोच अशा प्रकारचे कृत्य करतो’, यावरून समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे लक्षात येते. पैशासाठी लक्ष्मीदेवीची पूजा करणारे जर प्रत्येक स्त्रीकडे देवी लक्ष्मीचे रूप म्हणून पाहू लागले, तर स्थिती पालटण्यास वेळ लागणार नाही; मात्र ‘असा भाव, मनाची अशी स्थिती कशी निर्माण होणार ? आणि वासनेचे विचार कसे नष्ट होणार ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. ‘प्रत्येक जण संतवृत्तीचा होऊ शकत नाही’, असेही कुणी म्हणेल. दंडाच्या भीतीने लोक कायद्याचे पालन करतात. त्यामुळे अत्याचार करणार्यांना फाशीपर्यंतची शिक्षा आणि तीही कार्यवाहीत आणणारी यंत्रणा निर्माण केल्यामुळे मन अन् बुद्धी यांच्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल. दुसरे म्हणजे मनातील वाईट विचारांवर नियंत्रण मिळवणे, ते दूर करणे आणि योग्य कृती करणे यांसाठी मनाचा अभ्यास आवश्यक आहे. हा अभ्यास साधनेने होऊ शकतो. यामुळेच प्रत्येकाला साधना शिकवणे आवश्यक आहे. अशी साधना महिलाही करू लागल्या, तर त्यांनाही सार्वजनिक ठिकाणी कसे वागायचे ? हे समजेल. यांतही पालट होऊ शकतो. यातून स्त्री लक्ष्मीस्वरूपच भासेल, यात शंका नाही. अशी स्थिती येण्यासाठी हिंदूंनी श्री लक्ष्मीमातेकडेच प्रार्थना केली पाहिजे; कारण अशक्य ते शक्य करण्याची शक्ती तीच देऊ शकते, हेही तितकेच सत्य !
महिलांच्या रक्षणासाठी वरवरचे नाही, तर युद्धपातळीवर ठोस प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |