‘सुनेच्या साधनेत अडथळा येऊ नये’, यासाठी निरपेक्षपणे प्रयत्न करणारे रायचूर (कर्नाटक) येथील श्री. नागेश्वर राव चौधरी (वय ७१ वर्षे) आणि सौ. सत्यवाणी चौधरी (वय ६५ वर्षे) !
‘मी आणि माझे यजमान (श्री. श्रीकांत चौधरी) मागील १४ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधना करत आहोत. माझे सासू-सासरे (सौ. सत्यवाणी चौधरी (वय ६५ वर्षे) आणि श्री. नागेश्वर राव चौधरी (वय ७१ वर्षे)) रायचूर (कर्नाटक) येथे असतात. मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करते आणि यजमान बेंगळुरू येथे सेवा करतात. आम्ही ६ – ८ मासांतून एकदा घरी जातोे आणि साधारण ८ – १० दिवस घरी रहातो. माझे लग्न वर्ष २००५ मध्ये झाले. त्यापूर्वीच सासूबाई आणि सासरे यांना सनातन संस्थेविषयी माहिती होती. ते नामजप करत होते. लग्नानंतर माझ्या सेवेत अडथळा येऊ नये; म्हणून त्यांनी मला सर्वतोपरी सांभाळून घेतले. त्यांनी सून म्हणून माझ्याकडून कोणतीही अपेक्षा केली नाही आणि मला आई-वडिलांचे प्रेमही दिले. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. निरपेक्षता
१ अ. सून आणि मुलगा यांना ‘घरच्या कार्यक्रमांसाठी आले पाहिजे’, असा आग्रह न करता साधना अन् सेवा यांनाच प्राधान्य देण्यास सांगणे : इतक्या वर्षांमध्ये सासूबाई आणि सासरे यांनी आम्हाला घरी येण्याचा आग्रह कधीही केला नाही. एखादा सण असेल, तर ते आम्हाला ‘तुमचे काय नियोजन आहे ?’, असे विचारतात. आम्ही आमच्या सेवेचे नियोजन सांगितल्यावर ते सहजतेने म्हणतात, ‘ठीक आहे.’ घरी एखादा कार्यक्रम असेल, तर त्यांनी मला ‘कार्यक्रमासाठी आलेच पाहिजे’, असा आग्रह कधीच केला नाही. ते नेहमी म्हणतात, ‘तुम्ही साधना आणि सेवा यांनाच प्राधान्य द्या.’ आम्ही करत असलेली साधना आणि सेवा यांविषयी ते नेहमी आदराने बोलतात. ते आमच्याशी अधिकारवाणीने कधीच बोलले नाहीत. घरात आमच्या साधनेला पूरक वातावरण आहे.
१ आ. सून आश्रमातून घरी आल्यावर ‘तिने घरकाम करायला हवे’, अशी सासू-सासर्यांची अपेक्षा नसणे आणि तेव्हा त्यांनी स्वतः घरातील सर्व कामे करणे : मी आश्रमातून कधीतरी घरी जाते. त्यामुळे ‘मला विश्रांती मिळावी, तसेच वैयक्तिक कामांसाठी वेळ मिळावा’, यासाठी सासूबाई आणि सासरे घरातील सर्व कामे करतात. ‘मी घरातील काम करायलाच पाहिजे’, अशी त्यांनी कधीच अपेक्षा केली नाही. ते सहजपणेे घरातील सगळी कामे करतात. एखादा पदार्थ बनवायचा असेल, तर ‘तो कधी बनवूया ? कसा बनवूया ?’, असे सासूबाई मला विचारतात. तेव्हा मला ‘आपण आश्रमातच आहोत’, असे वाटते.
२. प्रेमभाव
२ अ. सासूबाईंनी सुनेसाठी तिला आवडणारा खाऊ बनवून आश्रमात पाठवणे : सासू आणि सासरे यांच्यामध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. मागील १४ – १५ वर्षांत रायचूरहून कुणी साधक गोव्याला येणार असेल, तर सासूबाई त्या साधकाच्या समवेत माझ्यासाठी खाऊ बनवून पाठवतात. खाऊ बनवण्यापूर्वी त्या ‘तुला काय आवडते ?’, असे मला विचारतात आणि तोच पदार्थ बनवून पाठवतात. मी घरी जाण्यापूर्वी त्या मला आवडणार्या पदार्थांसाठी लागणारे साहित्य आणून ठेवतात आणि पूर्वसिद्धता करून ठेवतात. त्यांचे हे सर्व प्रयत्न व्यावहारिक पातळीवर नसतात. त्यांच्यात मुळातच प्रेमभाव आहे आणि ‘त्यांना समजलेल्या साधनेचा प्रयत्न म्हणून त्या हे सर्व करतात’, असे मला वाटते.
२ आ. अनेक वर्षांनी प्रथमच सासरी पुष्कळ दिवस राहिल्यानंतर ‘स्वतःच्या आई-बाबांच्या समवेत आहोत’, असे सुनेला जाणवणे : सासर्यांची प्रकृती ठीक नसतांना मी पुष्कळ वर्षांनी प्रथमच एक मास घरी राहिले होते. त्यांची प्रकृती सुधारल्यावर मी आश्रमात जायला निघाले होते. तेव्हा सासू-सासरे दोघेही मला सोडायला खाली आले होते. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. तेव्हा ‘मी माझ्या आई-बाबांच्या समवेत आहे’, असे मला जाणवत होते. ‘एखाद्यावर निरपेक्ष प्रेम कसे करावे ?’, हे मला या प्रसंगातून शिकायला मिळाले.
३. देवावरील श्रद्धा
३ अ. रुग्णाईत असतांना ‘देव आम्हाला सांभाळतो’, अशी श्रद्धा असणे : सासूबाईंना ‘थायरॉईड’ आणि उच्च रक्तदाब यांचा त्रास असल्यामुळे त्यांची प्रकृती बरी नसते. असे असूनही त्या मला ‘काही दिवसांसाठी घरी ये’, असे कधीच म्हणाल्या नाहीत. याविषयी मी त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही सेवा करता. मला थोड्या दिवसांनी बरे वाटेल. देव आम्हाला सांभाळतो. तुम्ही आमच्यापासून दूर आहात. देव आम्हाला वेगवेगळ्या माध्यमांतून साहाय्य करतो.’’
सासर्यांना बाहेरगावी रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जायचे असतांना सासूबाईंनी स्वतःच त्यावर उपाययोजना काढली.
३ आ. काही वेळा सासूबाईंना ‘प्रसंग कसा हाताळायचा ?’, याचा ताण येतो. तेव्हा त्या देवाचे स्मरण करतात आणि देवावर श्रद्धा ठेवून स्थिर रहातात.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘माझ्या साधनेत अडथळा येऊ नये’, यासाठी घरातील सगळेच प्रयत्न करतात. हे माझ्या मागील जन्मातील पुण्याईचे फळ आहे. ‘सर्वांनीच मला आनंदाने सांभाळून घेतले आहे’, याबद्दल मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.
‘लग्नानंतर देवाने मला माझ्या साधनेसाठी पूरक असे सासू-सासरे आणि अनुकूल वातावरण दिले’, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते अन् ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना त्यांनी माझ्याकडून करून घ्यावी’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’
– सौ. संगीता श्रीकांत चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२३)
साधिका आणि तिचे सासू-सासरे यांनी स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून स्वतःत पालट घडवून आणणे
१. साधिका आणि तिच्या सासूबाई यांनी एकमेकींविषयी असलेल्या अपेक्षा न्यून करण्यासाठी प्रयत्न करणे
‘पूर्वी माझ्या आणि सासूबाईंच्या एकमेकींविषयी अपेक्षा असायच्या; पण सासूबाई त्यांवर प्रयत्न करत असत. त्या मला ‘स्वयंसूचना कशी देऊ ?’, असे विचारत असत आणि मी सांगितल्याप्रमाणे त्या स्वयंसूचना देत असत. माझ्या मनात त्यांच्याविषयी अपेक्षा असतील, तर त्याविषयी मी माझ्या यजमानांना सांगत असे. तेव्हा यजमान मला साधनेचा योग्य दृष्टीकोन देत असत. त्यानुसार मी प्रयत्न करत असे.
माझे लग्न होऊन १८ वर्षे झाली. या कालावधीत माझ्यात आणि सासूबाईंमध्ये कोणत्याच विषयावर वाद किंवा मतभेद झाले नाहीत. आम्ही एकमेकींविषयी कधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत. ‘मी अल्प कालावधीसाठी घरी येते. त्यामुळे अपेक्षांमुळे संघर्षात वेळ न घालवता त्यावर प्रयत्न करून स्वतः आनंदात रहायचे आणि कुटुंबियांनाही आनंद द्यायचा’, असा विचार करून प्रयत्न केल्यावर ‘प्रत्येक प्रसंगात देव साहाय्य करत आहे’, असे मला अनुभवायला मिळाले.
२. सुनेला त्रास होऊ नये; म्हणून सासूबाईंनी तिला सांभाळून घेणे
एकदा मी सासूबाईंना विचारले, ‘‘तुम्हाला माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तू अल्प कालावधीसाठी घरी येतेस. त्यामुळे ‘मी तुझ्यासाठी काय काय करू शकते ? तुला कसे समजून घेऊ शकते ? आपण एकमेकींना समजून घेऊन आनंदी कशा राहू शकतो ?’, यासाठी मी प्रयत्न करते.’’ मला त्रास होऊ नये; म्हणून त्या मला सांभाळून घेतात. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् त्यांनी अंतर्मनावर केलेले साधनेचे संस्कार’, यांमुळे आम्ही एकमेकींना समजून घेऊ शकतो.
३. सासूबाईंनी स्वतःकडून झालेल्या चुका सांगून ‘त्यावर प्रयत्न कसे करू ?’, असे सुनेला विचारणे आणि तिने सांगितल्याप्रमाणे स्वयंसूचना देऊन प्रयत्न करणे
सासूबाई मला त्यांच्याकडून झालेल्या चुका किंवा त्यांच्या मनात आलेले अयोग्य विचार सांगतात आणि ‘त्यांवर प्रयत्न कसे करू ?’, असे विचारतात. त्यांना एखाद्या गोष्टीचा ताण आला असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल, तर त्या माझ्याशी मोकळेपणाने बोलतात. मी त्यांना फार वेळही देत नाही; पण त्या मला सर्व गोष्टी सहजतेने सांगतात. त्या मला स्वयंसूचना विचारतात आणि स्वयंसूचना देऊन त्याप्रमाणे प्रयत्न करतात.
४. सुनेने यजमानांनी सांगितल्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न केल्यावर तिला हळूहळू कुटुंबियांविषयी आपुलकी वाटू लागणे
पूर्वी माझ्या मनात सासूबाईंविषयी पुष्कळ अपसमज होते. त्या वेळी मी माझ्या यजमानांना सर्व सांगत असे. ते माझे बोलणे ऐकून घ्यायचे आणि मला साधनेचे दृष्टीकोन द्यायचे. ‘मी या विचारांमध्ये न अडकता त्यांवर मात करून सासू-सासर्यांना समजून घ्यावे’, असे ते मला सांगत असत. काही वेळा मला होणार्या अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे माझे काही चुकले, तरी यजमान मला समजून घ्यायचे. ‘त्यांनी सांगितलेले प्रयत्न मी केलेच पाहिजेत’, अशी त्यांची अपेक्षा नसे. ते मला सांगायचे आणि प्रयत्न करण्यासाठी वेळ द्यायचे. त्यानंतर हळूहळू मला कुटुंबियांविषयी आपुलकी वाटू लागली.
५. सुनेला सासू-सासर्यांविषयी कृतज्ञता वाटू लागणे
या आधी माझ्या मनात सासू-सासर्यांविषयी कृतज्ञतेची जाणीव नसायची. माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा असायच्या आणि त्या व्यक्तही होत असत. काही मासांपासून मला त्यांच्याविषयी आतून कृतज्ञता वाटू लागली आहे.
६. सुनेने सांगितलेले सासर्यांनी ऐकणे
आता आमच्यात मायेतील विषयांवर बोलणे नसते. सासर्यांना साधनेचे काही प्रयत्न सांगितले किंवा त्यांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही सांगितले, तर ते सहजपणे ऐकतात. सासू-सासरे दोघेही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करतात.’
– सौ. संगीता श्रीकांत चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२३)