भारताच्या सुरक्षेसाठी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा म्हणजेच ‘कुश’कवच !
जगातील सर्वांत प्रभावी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांचा विषय येतो, त्या वेळी अमेरिका, रशिया आणि इस्रायल या देशांचे नाव पुढे येते. विशेष म्हणजे जगातील सर्वांत कार्यक्षम आणि धोकादायक समजल्या जाणार्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांपेक्षा भारताची ‘कुश’ ही यंत्रणा प्रभावी असणार आहे.
१. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्वदेशी संरक्षण उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन !
संरक्षण क्षेत्रामध्ये ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी केंद्रशासनाने विशेष धोरण आखले आहे. भारताने २०२२ -२३ या आर्थिक वर्षात तब्बल १६ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनांची निर्यात केली आहे. विशेष म्हणजे जगातील ८५ देशांमध्ये १०० भारतीय उद्योग संरक्षण उत्पादनांची निर्यात करत आहेत. संरक्षण निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने गेल्या ९ वर्षांत अनेक धोरणात्मक पुढाकार घेतला आहे आणि सुधारणा केल्या आहेत. निर्यात प्रक्रिया सुलभ आणि उद्योग अनुकूल बनवली गेली आहे. त्याचप्रमाणे ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांनी देशाला स्वदेशी आरेखन, विकास आणि संरक्षण उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन साहाय्य केले आहे. ज्यामुळे दीर्घकालीन आयातीवरील अवलंबित्व न्यून झाले आहे.
परकीय स्रोतांकडून संरक्षण खरेदीवरील खर्च वर्ष २०१८-१९ मधील एकूण खर्चाच्या ४६ टक्क्यांवरून डिसेंबर २०२२ मध्ये ३६.७ टक्क्यांपर्यंत न्यून झाला आहे. एकेकाळी प्रामुख्याने ‘संरक्षण उपकरणे आयातदार’ म्हणून ओळखला जाणारा भारत आता ‘डॉर्नियर-२२८’सारखी विमाने, तोफा, ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे, ‘पिनाका’ रॉकेट आणि लाँचर्स, रडार, सिम्युलेटर, चिलखती वाहने इत्यादींसह अनेक प्रमुख उत्पादनांची निर्यात करतो. ‘एल्.सी.ए.-तेजस’, ‘लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर’, ‘एअरक्राफ्ट कॅरियर्स’ आणि ‘एम्.आर्.ओ.’ उपक्रम यांसारख्या भारतातील स्वदेशी उत्पादनांची मागणीही वाढत आहे. त्याच वेळी भारताने संरक्षण क्षेत्रात १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीस (एफ्.डी.आय.) अनुमती दिली आहे. त्या अंतर्गत स्वीडनस्थित ‘साब’ या आस्थापनास रॉकेट सिद्ध करण्याचा कारखाना उभारण्याची अनुमती देण्यात आली आहे. याद्वारे १०० टक्के ‘एफ्.डी.आय.’द्वारे संरक्षण उत्पादनास चालना देण्याचेही धोरण भारताने राबवण्यास प्रारंभ केला आहे.
२. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रविरोधी ‘कुश’ प्रणाली !
देशासमोरील आव्हाने पहाता भारत अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे आणि त्यांची प्रणाली यांवर काम करत आहे. या अंतर्गत भारत ३५० किलोमीटरपर्यंतच्या श्रेणीसह स्वदेशी लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ (डी.आर्.डी.ओ.) या महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहे. ‘कुश’ असे या प्रकल्पाचे नाव असून या अंतर्गत भारत लांब पल्ल्याची पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे (एल्.आर्.-एस्.ए.एस्.) विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रे यांना लांब अंतरावरून प्रभावीपणे निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली तीन स्तरीय संरक्षण प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रशासनाने अडीच अब्ज डॉलर्सहून अधिक रुपयांचे (२० सहस्र ८२० कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे) प्रावधान (तरतूद) केले असून वर्ष २०२८-२९ पर्यंत या प्रणालीची निर्मिती पूर्ण होणे अपेक्षित आहे.
३. ‘कुश’ प्रणालीची वैशिष्ट्ये
भारताचा महत्त्वाकांक्षी ‘कुश’ प्रकल्प हा देशाच्या संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या शोधातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:च्या लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या विकासामुळे राष्ट्रीय सुरक्षा बळकट होणार असून हवाई धोक्यांचाही सामना करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे यामुळे ‘एल्.आर्-एस्.ए.एम्.’ विकसित करण्याची क्षमता असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होणार आहे. स्वदेशी ‘एल्.आर्-एस्.ए.एम्.’ प्रणाली लांब पल्ल्यावरील शत्रूची क्षेपणास्त्रे ओळखून ती नष्ट करण्यास सक्षम असेल. ही यंत्रणा लांब पल्ल्याची निगराणी आणि अग्नीशमक रडार यांनी सुसज्ज असेल, जी १५० ते ३५० किलोमीटर अंतरावर शत्रूवर आक्रमण करण्यास सक्षम असेल. यामध्ये विविध प्रकारची ‘इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रे (लहान, तसेच मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे) बसवली जातील, ज्याच्या साहाय्याने ही प्रणाली १५० किलोमीटर, २५० किलोमीटर आणि ३५० किलोमीटर अंतरावरील शत्रूस लक्ष्य करू शकतील.
४. भारताची ‘कुश’ आणि इस्रायलची ‘आयर्न डोम’ प्रणाली यांतील भेद !
स्वदेशी ‘एल्.आर्.-एस्.ए.एम्.’ यंत्रणा ही विमान आणि ‘एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम’ने सुसज्ज असेल, जी ३५० किलोमीटर अंतरावर हवेतील क्षेपणास्त्रांना थांबवण्यास सक्षम असेल. यामुळे जगातील सर्वांत धोकादायक क्षेपणास्त्रांनाही नष्ट करणे शक्य होणार आहे. जगातील सर्वांत प्रभावी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांचा विषय येतो, त्या वेळी अमेरिका, रशिया आणि इस्रायल या देशांचे नाव पुढे येते; मात्र विशेष म्हणजे यामध्ये भारताची ‘कुश’ ही यंत्रणा आता प्रभावी असणार आहे.
अ. इस्रायलची ‘आर्यन डोम’ ही प्रणाली सध्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांमध्ये अतिशय प्रगत मानले जाते. ही यंत्रणा ७० किलोमीटरपर्यंतच्या अल्प पल्ल्याचे रॉकेट्स आणि तोफांचा मारा रोखण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. त्याउलट भारताची ‘कुश’ प्रणाली क्षेपणास्त्रांसह विमानांना नष्ट करण्यास सक्षम असणार आहे.
आ. त्याचप्रमाणे ‘कुश’ प्रणालीमध्ये ‘आर्यन डोम’मध्ये नसलेल्या ‘काऊंटर-स्टिल्थ’ यंत्रणेचाही समावेश असणार आहे.
इ. केवळ इस्रायलच नव्हे, तर भारताने रशियाकडून विकत घेतलेल्या ‘एस्- ४००’ या यंत्रणेपेक्षाही भारताची ‘कुश’ यंत्रणा प्रभावी असणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेची ‘टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स’ (टी.एच्.ए.ए.डी.) आणि ‘पॅट्रियोट मिसाईल सिस्टीम’ यांच्यापेक्षाही भारताची ‘कुश’ प्रणाली प्रभावी असणार आहे.
– पार्थ कपोले
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, ६.११.२०२३)