संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायलविरोधातील ठरावाच्या समर्थनार्थ भारताचे मतदान
तेल अविव (इस्रायल) – संयुक्त राष्ट्रंमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या संदर्भात इस्रायलच्या विरोधात मांडण्यात आलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले आहे. पूर्व जेरुसलेम, सीरियामधील गोलान, तसेच पॅलेस्टाईनच्या काही भागांवर इस्रायलने केलेल्या नियंत्रणाच्या विरोधात हा ठराव होता. भारतासह १४५ देशांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले. ७ देशांनी विरोधात मतदान केले, तर १८ देश मतदानापासून दूर राहिले. यापूर्वीच इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, ते गाझा पट्टी पॅलेस्टिनी प्राधिकरणाकडे सोपवणार नाहीत. गाझावर केवळ इस्रायलच्या सैन्याचेच नियंत्रण असेल. येथे सुरक्षा राखण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय सैन्यावर विश्वास ठेवत नाही.
इस्रायली सैन्याने उत्तर गाझामधील हमासचे नियंत्रण संपुष्टात आणल्याचा दावा केला आहे. आता अल्-शिफा रुग्णालयातून मुलांना बाहेर काढण्यासाठी सैन्य साहाय्य करणार आहे. अल्-शिफा रुग्णालयावर गोळीबार झाला नाही किंवा त्याच्या जवळील कोणतीही जागा कह्यात घेण्यात आली नाही. रुग्णालय अजूनही चालू आहे, असे सैन्याने म्हटले आहे.
गाझामध्ये आतापर्यंत ५ सहस्र हवाई आक्रमणे
इस्रायली सैन्याने सांगितले की, गाझावर आतापर्यंत अनुमाने ५ सहस्र हवाई आक्रमणे करण्यात आली आहेत. ३ सहस्र ३०० आक्रमणे लढाऊ विमाने, ८६० लढाऊ हेलिकॉप्टर आणि ५७० ड्रोन यांद्वारे करण्यात आले.
जगाने अमेरिकेवर दबाव आणावा ! – हिजबुल्ला
हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह याने म्हटले की, इस्रायलच्या विरोधात निदर्शने आणि निषेध यांनी काहीही साध्य होणार नाही. गाझावरील आक्रमण थांबवायचे असेल, तर अमेरिकेवर दबाव आणावा लागेल. अमेरिका ही एकमेव शक्ती आहे, जी इस्रायलला रोखू शकते.
गाझामध्ये प्रत्येक १० मिनिटांनी होतो एका बालकाचा मृत्यू !
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, इस्रायली आक्रमणांमुळे गाझामध्ये प्रत्येक १० मिनिटांनी एक बालक मरत आहे. युद्धात गाझातील ११ सहस्रांहून अधिक लोक ठार झाले आहेत. यांत ४ सहस्र ५०६ लहान मुलांचा समावेश आहे.