विधानभवनाच्या पायर्यांवरील आमरण उपोषणामुळेच योजना संमत ! – राजेश क्षीरसागर
कोल्हापूर – कोल्हापूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. ही योजना संमत होण्यासाठी विधानभवनाच्या पायर्यांवर आमरण उपोषण करणारा मी पहिला आमदार आहे, हे सार्या जनतेला ठाऊक आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचा एक नेता या योजनेचे श्रेय घेऊ पहात आहे; पण थेट पाईपलाईनसाठी कुणी संघर्ष केला, लढा दिला, हे सारे कोल्हापूरवासियांना ठाऊक आहे, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. या योजनेत काँग्रेसच्या एका नेत्याने ७५ कोटी रुपयांचा अपहार केला आहे, त्याचे ‘ईडी’कडून अन्वेषण होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही क्षीरसागर यांनी या वेळी सांगितले.
काळम्मावाडी थेट पाणीवाहिनी योजनेचे पाणी शुक्रवारी रात्री पुईखडी प्रकल्प येथे पोचले. कोल्हापूर शहरासाठी महत्त्वाची योजना मार्गी लागल्यामुळे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे ११ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे आणि उदय भोसले, शिवाजीराव जाधव, मंगल साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगनेकर, नम्रता भोसले यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.