पंडित धीरेंद्र शास्त्री महाराजांनी ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आणि भद्रा मारुति यांचे दर्शन घेतले !
खुलताबाद (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – तालुक्यातील वेरूळसह खुलताबाद येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी १२ वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आणि भद्रा मारुति यांचे दर्शन घेत मंत्रोच्चारात अभिषेक केला. त्यांच्यासमवेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे सुरेश चव्हाणके आदी उपस्थित होते.
आजीबाईंचे आशीर्वाद घेत रस्त्यावरच घेतला चहा !
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना काही वेळ कुटियात ध्यानस्थ व्हायचे होते; मात्र ऐनवेळी त्यांनी खुलताबाद-फुलंब्री रस्त्यावरील एका झोपडीजवळ थांबून स्वत:च्या कटोर्यात चहा घेतला. येथे असलेल्या कलाबाई शेषराव फुलारे यांच्याशी संवाद साधत त्यांनी आशीर्वाद घेतला. हा प्रसंग अनेकांनी भ्रमणभाषमध्ये ध्वनीचित्रीकरण केले.