साधनेसाठी पूरक ठरणार्या दीपावलीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या !
नरकचतुर्दशी
भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला आनंद दिला, तो हा दिवस ! आपल्यातील स्वभावदोष आणि अहं या नरकासुररूपी वृत्तीचे निर्मूलन करण्यासाठी गुरुमाऊलीने स्वभावदोष अन् अहं निर्मूलनाची प्रक्रिया शिकवली. स्वभावदोष आणि अहं यांच्या बंधनातून तेच आपल्याला मुक्त करत आहेत. ही प्रक्रिया गांभीर्याने राबवून त्यापासून मुक्त होण्यातील आनंद अनुभवूया.
लक्ष्मीपूजन
या दिवशी श्रीविष्णूने देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले. जेथे लक्ष्मी तेथे भगवान श्रीविष्णूचे अस्तित्व असतेच. गुणांच्या दीपांनी स्वभावदोष-अहंरूपी अंधःकार नाहीसा होतो. या दिवशी भगवंताने हे गुणांचे धन दिले आहे, याची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवून त्यांच्या चरणी लीन होण्यातील आनंद घेऊया.
बलीप्रतिपदा
भगवान श्रीविष्णूने वामन अवतार घेऊन ज्या बलीराजाच्या डोक्यावर आपले चरणकमल ठेवून त्याला मुक्त केले, तो हा दिवस ! ‘आपल्या मनातील अहंरूपी बलीराजाच्या डोक्यावर श्रीगुरूंचे चरण आहेत’, हा भाव ठेवून त्यांच्या चरणी शरणागत होऊया. आज दिवसभरात मनात येणार्या प्रत्येक अहंच्या विचारावर श्रीगुरु त्यांचे चरणकमल ठेवून ते नाहीसे करत आहेत, हे अनुभवूया.
भाऊबीज
हा दिवस दिवाळीला जोडून येतो; म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. हा दिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! साधक गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतात. गुरुच साधकाच्या जीवनात प्रत्येक नाते निभावतात. खरंच ते आपले माता आणि पिता आहेत. माता-पिता होऊन ते आपल्यावर संस्कार करतात. ते आपले बंधूही आहेत. आपण लहान होऊन त्यांच्याकडे हट्टही करतो. सखा होऊनही तेच येतात. आपण आपले मन त्यांच्याकडेच मोकळे करतो अन् तेच ते जाणू शकतात. खरंच त्यांच्याइतके प्रेम आपल्यावर कोणीही करत नाही. अशा श्रीगुरूंच्या चरणी भाऊबिजेची ओवाळणी म्हणून काय देऊया ?
देव सर्वांचा स्वामी आहे. तो ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याच्याकडे सारेच आहे. आपण त्याला देऊ शकतो, असे काहीच नाही; पण सुदाम्याचे पोहे आनंदाने मागून घेऊन खाणार्या कृष्णाप्रमाणे आपली प्राणप्रिय गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आहे. त्यामुळे या दिवशी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया मनापासून अन् सातत्याने राबवून अखंड शरणागत अन् कृतज्ञता भावात रहाणे अन् अखंड गुरुस्मरण करणे, ही ओवाळणी आपण त्यांना देऊया.
– सौ. स्वाती शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.