राजकीय नेत्यांच्या दिवाळी फराळाला गेल्यानंतर त्यांना आरक्षणाविषयी जाब विचारा !
छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले होते. आता दिवाळीनिमित्त राजकीय नेत्यांकडून फराळाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. त्या कार्यक्रमाला जे कार्यकर्ते जातील, त्यांनी नेत्यांना मराठा आरक्षणाविषयी जाब विचारावा. ‘मराठा आरक्षणासाठी आवाज उठवा’, असे सांगावे, तसेच येणार्या अधिवेशनातही प्रत्येक आमदारांनी आरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे, असेही सांगावे, असे आवाहन त्यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोध केला आहे. त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या विरोधात हे नेते आता बोलत आहेत. पूर्वी जे बोलत होते, ते आता शांत आहेत. कुणीही आले, तरी तुमचा सामना करायला मराठे खंबीर आहेत.