ड्रग्ज आस्थापनाच्या पडताळणीत कसूर केल्याप्रकरणी पैठण येथील पोलीस निरीक्षकांचे स्थानांतर !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील पैठण ‘एम्.आय.डी.सी.’त अनुमाने ५०० कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडलेल्या महालक्ष्मी आस्थापनापासून पैठण एम्.आय.डी.सी. पोलीस ठाणे अवघ्या अर्धा एक किलोमीटरवर आहे. कारवाईनंतर बंद पडलेल्या आस्थापनाचा पहाणी अहवाल सादर करण्याचे आदेश ‘एम्.आय.डी.सी.’चे साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश केळे यांना दिले होते; मात्र ‘त्यांनी कामात कसूर केली’, असा ठपका ठेवत त्यांचे १० नोव्हेंबर या दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘कंट्रोल रूम’मध्ये तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले आहे.
२० दिवसांपूर्वी महालक्ष्मी केमिकल्स, ॲपेक्स आस्थापनातून ‘डी.आर्.आय.’च्या पथकाने केटामाइन, मेफेड्रॉन, कोकेन ड्रग्ज जप्त केले. जितेशकुमार हिनहोरिया, संदीप कुमावत, सौरभ गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती.
४०० भूखंडांच्या पैठण ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये सध्या फक्त १०० आस्थापने चालू आहेत. ड्रग्ज धाडीनंतर काही केमिकल आस्थापनांत आग लागली होती. त्यानंतर पोलिसांनी बंद पडलेल्या आस्थापनांची पहाणी करणे आवश्यक होेते. तसेच येथील ‘ड्रग्ज’चा काळा धंदा पोलिसांच्या संमतीनेच चालू असल्याचा ‘डी.आर्.आय.’ला संशय आहे.
संपादकीय भूमिका :कामचुकार पोलीस अधिकार्यांचे स्थानांतर न करता त्यांना कठोर शिक्षाच करायला हवी ! |