सातारा येथील शेतकरी कृष्णा नदीपात्रात घेणार जलसमाधी !
कृष्णा नदीपात्र आणि कण्हेर कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यासाठी निवेदन !
सातारा, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून धरणातही पाणीसाठा अल्प आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करण्यात येत आहे. विविध भागांतून धरणातील पाणी सोडावे अशी मागणी होत आहे. आता कृष्णा आणि उरमोडी नदी, तसेच कण्हेर डावा कालवा लाभक्षेत्रात पाणी सोडण्यासाठी सातारा तालुक्यातील शेतकर्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी १७ नोव्हेंबरला कृष्णा नदीपात्रात जलसमाधी घेण्याची चेतावणी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’च्या वतीने देण्यात आली आहे. याविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा, कोरेगाव, कर्हाड तालुक्यातील असंख्य शेतकरी शेती करतात; परंतु या हंगामात सातारा सिंचन विभागाकडून आमच्या हक्काचे पाणी दुष्काळ टंचाईच्या नावाखाली अधिकाराचा अपलाभ घेऊन सोडले जात आहे. या पाण्याची चोरी होत आहे. हे पुराव्यानिशी सिद्ध केल्याने आम्हाला त्रास देण्यात येत आहे. लेखी आश्वासन देऊनही पाणी सोडण्यास सूडभावनेने टाळाटाळ होत आहे. यामुळे शेतकर्यांची हानी झाली आहे. आता बाधित शेतकर्यांना बरोबर घेऊन १७ नोव्हेंबर या दिवशी सातारा तालुक्यातील जिहे-कटापूर येथे कृष्णा नदीत जलसमाधी घेणार आहोत.
संपादकीय भूमिका :शेतकर्यांना अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वतःहून लक्ष का घालत नाही ? |