भाऊबीज
भाऊबीज साजरी करण्यामागील पूर्वपीठिका !
गोवर्धन पूजेच्या दुसर्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुक्ल द्वितीयेला ‘भाऊबीज’ हा सण असतो. भाऊबीजेचा सण यमराजामुळे झाला होता. त्यामुळे याला ‘यमद्वितीया’ असेही म्हणतात. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी भोजन करण्यासाठी गेला होता. त्यामुळे या दिवसाला ‘यमद्वितीया’ म्हटले जाते. भाऊबीजेला यम आणि यमुना यांची कथा ऐकली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी यमुना आपला भाऊ भगवान यमराजाला आपल्या घरी आमंत्रित करून त्याला टिळा लावून आपल्या हाताने स्वादिष्ट भोजन देते. यमराज पुष्कळ प्रसन्न झाल्याने त्याने यमुनेला वरदान मागायला सांगितले.
यमुना म्हणते, ‘‘आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला निमंत्रित करून त्याला स्वतःच्या घरचे भोजन खाऊ घालेल आणि त्याच्या कपाळावर टिळा लावेल, त्यांना यमाचे भय राहू नये.’ यमराजाने ‘तथास्तु’ म्हटले. तेव्हापासून कार्तिक शुक्ल द्वितीयेला बहीण आपल्या भावाला भोजन देऊन टिळा लावते. यामुळे भाऊ-बहीण यांच्यामधील मायेतील देवाणघेवाण अल्प होते.
जो या दिवशी भावा-बहिणीची ही परंपरा निभावून यमुनेमध्ये स्नान करतो, त्याला यमराज यमलोकातील यातना देत नाही. या दिवशी मृत्यूची देवता यमराज आणि त्याची बहीण यमुना यांचे पूजन केले जाते.
भावाचे औक्षण केल्याने बहिणीला सूक्ष्म स्तरावर होणारे लाभ !
१. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते; कारण स्त्रीमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या भावांपैकी एक आहे ‘वात्सल्यभाव’ ! यामध्ये करुणेचे प्रमाण अधिक असते. भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावाचे औक्षण करतांना तिच्यामध्ये वात्सल्यभाव कार्यरत असतो. २. भाऊबीजेच्या दिवशी जेव्हा बहीण भावाचे औक्षण करते. तेव्हा भावाच्या श्वासोच्छ्वासातून त्याच्या देहात तेजतत्त्वाचे कण प्रवाहित होतात. त्यामुळे त्याचे आयुष्य वाढते. त्याच्या शरिराभोवती संरक्षककवच निर्माण होते. ३. जेव्हा बहीण भावाचे औक्षण करते, तेव्हा तिच्यामध्ये असलेली अप्रकट अवस्थेतील शक्तीस्पंदने प्रकट स्वरूपात कार्यरत होतात. त्यानंतर त्यांचे प्रक्षेपण भावाच्या दिशेने होते. यामुळे भावाला कार्यशक्ती प्राप्त होते. |
श्रीकृष्ण आणि सुभद्रा यांची भाऊबीज !
नरकासुराच्या वधानंतर भगवान श्रीकृष्ण आपली बहीण सुभद्रेला भेटायला याच दिवशी गेला होता. सुभद्रेने आनंदाने त्याचे स्वागत करून आपल्या हातांनी त्याला स्वयंपाक करून त्याला भोजन वाढले. त्याच्या कपाळाला टिळा लावून औक्षण केले.
भाऊबीज आणि प्रचलित अन्य नावे !
भाऊबीजेला संस्कृतमध्ये ‘भगिनी हस्ता भोजना’ असे म्हणतात. कर्नाटकात याला ‘सौदरा बिदिगे’ या नावाने ओळखले जाते, तेच बंंगालमध्ये भाऊबीजेला ‘भाई फोटा’ या नावानेे ओळखले जाते. गुजरातमध्ये ‘भौ’ किंवा ‘भै-बीज’, तर महाराष्ट्रात ‘भाऊबीज’ असे म्हटले जाते. अधिकतर प्रांतांमध्ये ‘भाईदूज’ या नावानेच ओळखले जाते. नेपाळमध्ये याला ‘भाईटीका’ असे म्हणतात. मिथिलामध्ये याला ‘यमद्वितीया’च्या नावाने साजरे केले जाते.
भाऊ किंवा बहीण नसल्यास काय करावे ?
एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर ती कोणत्याही एखाद्या परपुरुषाला भाऊ समजून त्याचे औक्षण करते. जर तेही शक्य नसेल, तर तिने चंद्राला भाऊ समजून त्याचे औक्षण करावे. या दिवशी कुणाही पुुरुषाने आपल्या घरी किंवा आपल्या पत्नीच्या हातचे अन्न ग्रहण करता कामा नये. या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी वस्त्रे इत्यादी भेटवस्तू घेऊन जावीत आणि तिच्या घरी भोजन करावे. जर सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा इतर कोणत्याही स्त्रीला बहीण मानून तिच्याकडे भोजन करावे.
भावाला विडा का द्यावा ?
भाऊबीजेला भावाचे भोजन झाल्यानंतर त्याला विडा खायला देण्याचे अधिक महत्त्व आहे. ‘विडा दिल्यामुळे बहिणीचे सौभाग्य अखंड रहाते’, असे म्हटले जाते.
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |