Kadamba Goa (Drunk-N-Drive) : प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा ‘कदंब’चा मद्यधुंद चालक निलंबित
पणजी, १० नोव्हेंबर (वार्ता.) : वाळपई येथे निघालेल्या कदंब महामंडळाच्या बसच्या मद्यधुंद चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा संतापजनक प्रकार ९ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी घडला होता. या घटनेनंतर ९ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा चालकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली आहे. एल्विस रॉड्रिग्ज असे निलंबित चालकाचे नाव आहे. जुने गोवे परिसरात ही घटना घडली होती.
ही बस ९ नोव्हेंबरला सायंकाळी पणजीहून वाळपई येथे निघाली होती. पणजी येथून सुटल्यानंतर मद्यधुंद चालकाने एका दुचाकीला धडक दिली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटत असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशांनी आराडाओरड करून बसचालकाला बस थांबवण्यास भाग पडले आणि नंतर चालकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या बसमध्ये सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर घरी परतणारे कर्मचारी मोठ्या संख्येने होते आणि बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. बस थांबल्यानंतर घाबरलेले प्रवासी खाली उतरले. यातील काही जण दुसर्या बसने गेले. कदंब महामंडळाने पणजी डेपोतून त्वरित दुसरा चालक पाठवून बस वाळपई येथे मार्गस्थ केली.
बसचालकाचा चालक परवाना रहित होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
दारू पिऊन वाहन चालवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. निलंबित कदंब बसचालकाचा चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) रहित केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते एका पत्रकार परिषदेत संबोधित करत होते. या वेळी ‘कदंब’च्या मद्यधुंद चालकाविषयी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील उत्तर दिले.