दीपावली म्हणजे सनातन हिंदु संस्कृतीचे दर्शन आणि संकल्पपर्व !
भगवान श्रीकृष्णाचे जीवन आणि कार्य समजून घेऊन त्याच्या विजिगीषु कार्याचे स्मरण करून ते आचरणात आणणे महत्त्वाचे !
‘चातुर्मास आणि शरद ऋतू यांचे उत्तररंग म्हणजे दीपावली पर्व ! उत्सव, रोषणाई, संपन्नता, प्रेम आणि भक्ती यांचे हे प्रतीक ! कौटुंबिक आणि सामाजिक अभिसरण यांतून दीपावलीत नात्यांना नवा उजाळा येतो. भेटीगाठी होऊन आनंद द्विगुणित होत असतो. भेटवस्तू आणि नव्या खरेदीची लयलूट होते. बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. दिवाळीत श्रीमंतांचे देखणे निवास असो वा गरिबाची झोपडी असो, सर्वच घरेदारे पणती, आकाशकंदील आणि रांगोळी यांनी सजतात. हीच तर सनातन हिंदु घराची ओळख ठरते. या पर्वात पणती आणि आकाशकंदील यांचे वैशिष्ट्यपूर्ण मंद प्रकाशाने संपूर्ण भारतवर्ष एखाद्या दीपमालेप्रमाणे लखलखत असते अन् आपल्या प्राचीन संस्कृतीचे जगाला सुखद दर्शन होते. सनातन हिंदु परंपरा आणि आधुनिक साजशृंगार यांचा मेळ घालून माणसे, घरे अन् नगरे यांना जणू नवजीवन मिळते. दीपावली सणाने आपली कुटुंबव्यवस्था सुदृढ होते आणि जगाला आपल्या हिंदु कुटुंबव्यवस्थेचे अप्रूप आहे. ही सनातन आणि सर्वसमावेशक व्यवस्था टिकवणे, हे आपले कर्तव्य आहे.
१. दीपावली : समाज बांधिलकीचे पर्व !
कुटुंब म्हणजे ४ व्यक्ती नाहीत, तर समाजरूपी परिवार हे आपल्या हिंदु संस्कृतीचे वैशिष्ट्य दीपावली पर्वात अधोरेखित होते. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजेच संपूर्ण पृथ्वी हेच आपले कुटुंब आहे’, हे आपले वैश्विक ब्रीद आहे. पाश्चात्त्य विकृतीचा पगडा आणि कृत्रिम व्यापारी दिखावा, सांस्कृतिक अधोगती अन् संधीसाधू हितशत्रू हे हिंदु धर्मात फूट पाडून जातीय, भाषिक, प्रांतिक आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याचा कट करतच असतात. हिंदु परंपरा, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि कुटुंबव्यवस्था या ४ स्तंभांवर सनातन भारतवर्ष आजही भक्कम उभे आहे. त्या थोर भारतीय प्रतिमेला साजेसे कार्य आपण या दीपावली पर्वात करून आपले जीवन सार्थकी लावूया आणि समाजसेवेचे व्रत घेऊन समाजाभिमुख होऊया. विशाल हिंदु परिवाराचे विराट विश्वरूप जगाला दाखवून दीपवूया. धर्म, संस्कार, सेवा आणि करुणा यांनी उपेक्षित हिंदु बांधवांना आधार देऊया. असे हे समाज बांधिलकीचे पर्व आहे.
२. वसुबारसेच्या निमित्ताने संकल्प !
वसुबारस म्हणजेच गोद्वादशी ही ९ नोव्हेंबरला झाली. त्या दिवशी सवत्स धेनूचे पूजन केले जाते. भारतीय वंशाची, वशिंड असलेली गाय आणि गोवंश म्हणजे देशी बैल, पाडसे यांचे संरक्षण करण्याचा आपण या निमित्ताने संकल्प करूया. याचसमवेत ‘केंद्र सरकारने गोवंश हत्याबंदीचा कठोर कायदा करावा’, अशी मागणी करावी. भारत हा शेतीप्रधान देश आणि गोवंश हा शेतीचा कणा आहे. ‘गायीचे दूध हे मातेच्या दुधासमान अमृत आहे’, हे विज्ञान सांगते. गोमय हे पर्यावरणपूरक सेंद्रिय खत आहे. सेंद्रिय शेतीद्वारे विषाणूमुक्त धान्य आपल्या मुलाबाळांना मिळणे, हा आपला अधिकार आहे. गोमय, म्हणजे गायीचे शेण हे वातावरणातील सूक्ष्म जंतू नष्ट करते. त्यामुळे गोमयाने घर सारवण्याची पूर्वी घरोघरी पद्धत होती. ते मांगल्यतेचे आणि स्वच्छतेचे भारतीय वैशिष्ट्य आपण शक्य तेथे मंदिरांमध्ये अन् शाळेत प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा चालू करावे. गोमयापासून औषधे, खते, कुंड्या, तसेच अनेक गृहोपयोगी वस्तू बनवल्या जातात. त्या खरेदी कराव्यात. गोमूत्र हे आयुर्वेदातील एक आवश्यक औषध असून त्याच्या साहाय्याने अनेक असाध्य व्याधी आटोक्यात येतात, हे सिद्ध झाले आहे. पंचगव्य म्हणजे देशी गायीचे दूध, दही, गोमूत्र, गोमय आणि तूप हे ५ पदार्थ असतात. पंचगव्याचा उपयोग देवपूजेपासून विविध व्याधींवर रामबाण औषध म्हणून केला जातो. आज ‘पंचगव्य चिकित्सा’ही प्रसिद्ध होत आहे. आपण याचा पुरस्कार आणि प्रचार करावा. त्यासाठी आपण गोहत्या थांबवणे आणि देशी वंशाच्या गोवंशाचे संवर्धन करण्याचा संकल्प दिवाळीत करूया .
३. विविध क्षेत्रांत करावयाचा राष्ट्रीय संकल्प !
३ अ. धन्वन्तरि जयंती आणि यमदीपदान : देवतांचे वैद्य आणि आयुर्वेद चिकित्सक धन्वन्तरि हे समुद्रमंथनातून आश्विन कृष्ण त्रयोदशीला प्रकटले, तसेच माता लक्ष्मीही प्रकटली. त्यामुळे या दिवशी श्री धन्वन्तरि आणि श्री लक्ष्मी यांचे पूजन केले जाते. याचसमवेत या दिवशी ‘कुटुंबातील कुणालाही अकाली मृत्यू येऊ नये’, यासाठी यमदेवांकडे प्रार्थना करून दक्षिण दिशेस दीप ठेवून पूजिले जाते. आरोग्य राखतांना आयुर्वेद ही जीवनपद्धत आपण स्वीकारण्याचा संकल्प करावा. शक्यतो आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिओपॅथी यांच्या साहाय्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवावी. आवश्यकता असल्यास त्यानंतर अॅलोपॅथीचा वापर करावा.
३ आ. धन समर्पणाचा संकल्प धनत्रयोदशीला करा ! : या दिवशी महालक्ष्मीचे पूजन करतात, म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन करावे. निसर्गलक्ष्मी, पर्यावरणलक्ष्मी, राष्ट्रलक्ष्मी आणि स्वधर्मलक्ष्मी यांचे जागरण समाजात करावे. आपल्या घरोघरी स्त्रीपुरुष, मुले-मुली, सूना हे सर्वजण सुशिक्षित असून नोकरी आणि व्यवसाय यांद्वारे उत्कर्ष करत आहेत. ही समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळेच प्रत्येक कमावत्या व्यक्तीने स्वतःच्या वार्षिक उत्पन्नातील अर्धा टक्के रक्कम ही देव, देश, धर्म, गरजू समाज आणि हिंदु संघटना यांसाठी या दिवशी धन समर्पणाचा संकल्प करावा.
३ इ. भगवान श्रीकृष्णाच्या विजिगीषु कार्याचे स्मरण म्हणजे नरकचतुर्दशी ! : या दिवशी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांनी नरकासुराचा वध केला. भगवान श्रीकृष्णाने १६ सहस्र स्त्रियांची सुटका करून त्यांना स्वतःचे नाव देऊन समाजात पुन्हा सन्मान मिळवून दिला. आजही अशा लाखो पीडित स्त्रिया सन्मानाने जीवन जगण्याची आशा धरून आहेत, ज्या परधर्मियांचा अत्याचार सहन करत आहेत. त्यांना स्त्रीत्वाचा सन्मान मिळवून देण्याचा संकल्प करूया. श्रीकृष्णचे जीवन आणि कार्य समजून घेऊन त्याच्या विजिगीषु कार्याचे स्मरण करावे.
३ ई. भारताला परमवैभव संपन्न करण्यासाठी लक्ष्मीपूजन ! : लक्ष्मी ही विष्णुपत्नी आहे. सागरातून प्रकट झाली. तिचे पूजन हे प्रतिकात्मक संपूर्ण सृष्टीचे पूजन आहे. या दिवशी महालक्ष्मी म्हणजे धन, सोने नाणे, व्यावसायिक वह्या, मालमत्तेची कागदपत्रे, लेखण्या आणि तराजू यांचे पूजन केले जाते. लक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, वास्तूलक्ष्मी, राष्ट्रलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, ज्ञानलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, स्वराज्यलक्ष्मी, अशा विविध रूपांतील लक्ष्मीचे ध्यान आणि पूजन करावे, जेणेकरून व्यष्टीसह भारताला परमवैभव संपन्न करता येईल.
३ उ. बलीप्रतिपदा म्हणजे आत्मचिंतनाचे पर्व ! : वामन अवतार घेऊन भगवान विष्णूंनी बळी या महान दैत्य सम्राटांचे गर्वहरण करून त्यास पाताळात राज्य दिले. तो विष्णुभक्त झाला. तेथे भगवंत स्वतः त्याचे द्वारपाल म्हणून रहातात. ‘शरण आलेल्या भक्तास भगवंत पराकोटीचे अभय देतात’, हे सनातन संस्कृतीचे उत्कट सार आपल्याला यातून शिकायला मिळते. दैत्य सम्राट बळी हा थोर विष्णुभक्त प्रल्हाद याचा नातू होता हे विशेष ! ‘आपणही बळी सम्राटासारखे जीवनात उतूमातू नये’, या संदेशाची आठवण आपल्याला हा सण करून देतो. या निमित्ताने ध्यान, साधना, ईश्वरचरणी लीन होणे, नामस्मरण आणि आपल्या वैदिक इतिहासाचे पुन्हा अवलोकन करावे.
३ ऊ. भाऊबीज – चिरंतन बांधिलकीचे व्रत : भाऊबीज यास ‘यमद्वितीया’ही म्हणतात. ‘यम आणि यमी किंवा यमुना हे सख्खे भाऊ बहिण आहेत’, असे पुराणे सांगतात. या दिवशी स्वतः यमदेव बहिणीकडे जाऊन तिला भेटवस्तू देतात. बहीण यमुना त्यांना ओवाळून औक्षण करते. यमदेव बहिणीवर प्रसन्न होऊन वर देतात, ‘कार्तिक द्वितीयेला जे भाऊबहीण प्रेमाने भाऊबीज साजरी करतील, त्यांना यमदेवाचे भय नसेल.’ या दिवशी बहीण भावासाठी हे अभय मागत असते. कुटुंबात भाऊ आणि बहीण यांचे नाते हे परमपवित्र आहे. या नात्याचा समाजात विस्तार करून सामाजिक कार्यात एकत्र राष्ट्रकार्य करावे.
४. प्रत्येक हिंदूच्या हृदयात विवेकदीप प्रज्वलित करणे आवश्यक !
बंधू-भगिनींनी विविध सेवाकार्ये निवडून उपेक्षितांना आधार द्यावा. अशाने त्यांच्या जीवनात दिवाळीचा प्रकाश नक्की पसरेल, असा विश्वास वाटतो. आज अज्ञान, गरिबी, द्वेष, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, धर्मग्लानी ही काजळी काढून प्रत्येक हिंदूच्या हृदयात विवेकदीप प्रज्वलित करण्याच्या कार्याची आवश्यकता आहे. त्यानेच सामान्य सज्जन व्यक्तीच्या जीवनात निरंतर दिवाळी अवतरेल !
मी अविवेकाची काजळी । फेडोनी विवेकदीप उजळी ॥
तै योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥
– ‘ज्ञानेश्वरी’, अध्याय ४, अभंग ५४
‘समाजमनावर साचलेली अविवेकाची काजळी दूर होऊन विवेकाचा दीप उजळो आणि सनातन वैदिक हिंदु धर्मात सौहार्द, सुख आणि आनंदरूपी प्रकाश सर्वांच्या जीवनात पडो’, अशा दिवाळीनिमित्त शुभेच्छा !’
– श्री. विवेक प्रभाकर सिन्नरकर, आर्किटेक्चर (स्थापत्यशास्त्र पदवीधर) आणि संपादक, ‘ज्ञानेश्वर’ त्रैमासिक, पुणे. (७.११.२०२३)