Diwali : श्रीकृष्‍णाची अनंत नावे आणि त्‍याचे माहात्‍म्‍य !

१२ नोव्‍हेंबर या दिवशी ‘नरकचतुर्दशी’ आहे. त्‍या निमित्ताने श्रीकृष्‍णाविषयीची अद़्‍भुत माहिती !

Diwali, Deepawali, diwali 2023, deepawali 2023, Narakchaturdashi, महाभारतातील संजय श्रीकृष्‍णाला ओळखून आहे. तो ‘श्रीकृष्‍ण सगुण, साकार परब्रह्म आहे’, हे जाणतो. संजयचे अंत:करण शुद्ध आहे आणि त्‍याची श्रीकृष्‍णावर परमभक्‍ती आहे. संजय युद्ध चालू होण्‍याच्‍या आधी धृतराष्‍ट्राला श्रीकृष्‍णाचा पराक्रम सांगतो.

१. श्रीकृष्‍णाचे सामर्थ्‍य आणि त्‍याचे पराक्रम

श्रीकृष्‍णाच्‍या सुदर्शनचक्राचा मधला भाग ५ हात रूंद आहे, ते तेजोमय आहे, तसेच ते कौरवांचे संहारक आहे. श्रीकृष्‍ण पांडवांचा प्रियतम आहे. श्रीकृष्‍णाने नरकासूर, कंस, शिशुपाल इत्‍यादी उन्‍मत्त राजांचा वध केला. श्रीकृष्‍णाची संकल्‍प शक्‍ती अशी विलक्षण आहे की, केवळ इच्‍छाशक्‍तीने तो सारे जग स्‍वाधीन करू शकतो. यासह तो संकल्‍पशक्‍तीने सगळे जग तो भस्‍म करू शकतो; पण त्‍याचे भस्‍म करायला सगळे जगही समर्थ नाही. जिथे सत्‍य आहे, धर्म आहे तिथे श्रीकृष्‍ण आहे आणि जिथे श्रीकृष्‍ण आहे तिथे जय आहे.

श्रीकृष्‍ण हा स्‍वतःच्‍या मायाशक्‍तीने सगळ्‍या विश्‍वाला मोहित करतो; पण जे त्‍याला शरण जातात, त्‍यांना माया स्‍पर्श करत नाही आणि मोह त्‍यांच्‍या आसपासही फिरकत नाही.

२. श्रीकृष्‍णाची नावे आणि त्‍यांचे रहस्‍य धृतराष्‍ट्र संजयला श्रीकृष्‍णाची नावे आणि त्‍यांचे रहस्‍य विचारतो. त्‍यावर संजय सांगतो…

अ. वासुदेव : श्रीकृष्‍ण माया पसरवतो. त्‍या मायेत सगळे जग वास करते म्‍हणून वासुदेव. श्रीकृष्‍ण, म्‍हणजे प्रकाश म्‍हणून वासुदेव. सगळे देव त्‍याच्‍यात वास करतात म्‍हणून वासुदेव !

आ. विष्‍णु : आपल्‍या चरणांनी सगळे विश्‍व व्‍यापले म्‍हणून विष्‍णु.

इ. माधव : मौन, ध्‍यान आणि योग यांनी तो आत्‍म्‍यावरील आवरण दूर करतो म्‍हणून माधव.

ई. मधु : पृथ्‍वी, आप, तेज, वायु आणि आकाश या तत्त्वांचा संहारकर्ता किंवा ही सगळी तत्त्वे त्‍याच्‍यात विलीन होतात म्‍हणून मधु.

उ. मधुसूदन : मधुदैत्‍याचा वध केला म्‍हणून मधुसूदन.

ऊ. कृष्‍ण : भक्‍तांची मने खेचून आणि आकर्षून घेतो म्‍हणून कृष्‍ण.

ए. पुंडलिकाक्ष : पुंडलिक म्‍हणजे अक्षय, अविनाशी, परमपद, हृदयकमल, त्‍यात वासुदेव रहातो. तो अक्षय आहे म्‍हणून पुंडलिकाक्ष.

ऐ. जनार्दन : परमदृश्‍याचे दलन करतो म्‍हणून जनार्दन.

ओ. शाश्‍वत : तो सत्त्वातून कधीच ढळत नाही आणि सत्त्व त्‍याच्‍यापासून कधी ढळत नाही म्‍हणून शाश्‍वत.

औ. वृषभेक्षण : वृषभ म्‍हणजे वेद आणि इक्षण म्‍हणजे जाणणे. वेदाद्वारे तो जाणला जातो म्‍हणून वृषभेक्षण.

अं. अज : कुठल्‍याही गर्भात जन्‍म घेत नाही म्‍हणून अज.

क. दामोदर : इंद्रियांचा प्रकाश आणि इंद्रिये स्‍वाधीन असलेला, इंद्रियात अत्‍यंत दमन केलेला म्‍हणून दामोदर.

ख. वृषीकेश : हर्ष, स्‍वरूपसुख आणि ऐश्‍वर्य असे तीनही श्रीकृष्‍णामध्‍ये आहेत म्‍हणून वृषीकेश.

ग. अधोक्षज : अधप्रदेशात कधीच क्षय होत नाही, म्‍हणजे संसारात लुप्‍त होत नाही म्‍हणून अधोक्षज.

घ. नारायण : नरांचा आश्रय म्‍हणून नारायण.

च. पुरुषोत्तम : सर्व प्राणिमात्रांचा पूर्णकर्ता आणि त्‍यांचा लयही त्‍याच्‍यातच होतो म्‍हणून पुरुषोत्तम.

छ. सर्व : कर्म आणि कारण, उत्‍पत्ती अन् प्रलय हे सर्व जो आहे तो सर्व.

ज. जिष्‍णु : सर्वांवर जय मिळवला म्‍हणून जिष्‍णु.

झ. अनंत : तो शाश्‍वत आहे; म्‍हणून अनंत आहे.

ट. गोविंद : गो म्‍हणजे इंद्रियांचा प्रकाश, त्‍याचा सूत्रधार म्‍हणून गोविंद.

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्‍टेंबर २०२३)