‘दिवाळी पहाट’चे बाजारीकरण !

gदि

दिवाळीच्‍या पहिल्‍या दिवशी भगवान श्रीकृष्‍णाने नरकासुराचा वध केला, त्‍याचे प्रतीक म्‍हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून सडा-रांगोळी काढून घराभोवती दिवे लावून मंगलमय वातावरणात आई मुलांना ओवाळते. सूर्योदयापूर्वी उठून अभ्‍यंगस्नान केले जाते. नंतर देवाची पूजा किंवा नामजप अथवा भगवंताचे ध्‍यान केल्‍याने विशेष लाभ होतो. या दिवशी यमतर्पण, शिवपूजा, विविध वस्‍तूंचे दान हेही केले जाते. अशा प्रकारे हा सण आध्‍यात्‍मिकदृष्‍ट्या आपल्‍या घरी साजरा केल्‍याने घरात चैतन्‍य येते. सौख्‍य, मांगल्‍य टिकून रहाते. अनेक जण भक्‍तीमय भजने किंवा देवाची गाणी आपल्‍या घरी लावतात.

सध्‍याच्‍या काळात मात्र दिवाळीच्‍या पहाटे हे सर्व मंगल विधी सोडून घराबाहेर जाऊन ‘दिवाळी पहाट’ साजरी करण्‍याचे प्रमाण समाजात वाढले आहे. आपले शरीर, मन, आपल्‍या घराला शुद्ध आणि सात्त्विक करणारी ही दिवाळी आम्‍ही जर घराबाहेर साजरी करणार असू, तर वर्षातून केवळ एकदा येणार्‍या या पवित्र दिवसाचा आपल्‍याला अन् आपल्‍या कुटुंबियांना काय लाभ होणार ? आपण तमोमय अंधाराकडून ज्ञानमय प्रकाशाकडे नेणारी दिवाळी साजरी करायची कि ऐन दिवाळीत घराबाहेर जाऊन कोणतेही विशेष महत्त्व नसलेले ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम बघायचे ? पूर्वी तरी हे कार्यक्रम विनामूल्‍य होत असत; पण आता यातही सोम्‍या-गोम्‍या लोकांची घुसखोरी झाली आहे. अनेकदा नेते-पुढारी मंडळी असे कार्यक्रम आयोजित करतात. भक्‍तीमय संगीताच्‍या नावाखाली मोठमोठे व्‍यावसायिक आणि कलाकार असे कार्यक्रम पैसे घेऊन करत आहेत. काळानुसार या कार्यक्रमाचे रूप पालटून आता ‘दिवाळी पहाट’ हा एक मोठा ‘इव्‍हेंट’च झाला आहे. लोक आर्थिक गणिते जुळवण्‍यासाठी याचा वापर करत आहेत. कलाकार, निवेदक, व्‍यासपीठ, सजावटकार यांचे मानधन आणि प्रायोजक अशा सगळ्‍या बाजारू गोष्‍टींमुळे दिवाळी पहाट हा वार्षिक व्‍यावसायिक कार्यक्रम बनला आहे. अशा वातावरणात पावित्र्य, मांगल्‍य, भक्‍ती टिकणार कशी ? ‘दिवाळी पहाट’सह संपूर्ण दिवाळीच आध्‍यात्मिकदृष्‍ट्या विधीवत् शास्‍त्रानुसार घरी साजरी केल्‍याने कुटुंबाला लाभ होईल. संत नामदेव म्‍हणतात, ‘सण दिवाळीचा आला । नामा राऊळाशी गेला । हाती धरोनी देवाशी । चला आमुच्‍या घराशी ॥’  तेव्‍हा मनातील अज्ञान आणि अहंकार यांचा अंधार भक्‍तीच्‍या दिव्‍याने दूर करणारी दिवाळी घरीच करणे सर्वथा उत्तम !

– श्री. नीलेश देशमुख,

नवी मुंबई.