श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या पादुकांच्या महापूजेला ५८९ वर्षे पूर्ण !
श्री क्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – नृसिंह सरस्वती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, श्री दत्त महाराज यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुद्वादशीला (१० नोव्हेंबर) श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या पादुकांच्या महापूजेला ५८९ वर्षे पूर्ण झाली. येथील पुजार्यांचे पूर्वज आणि ‘श्रीं’च्या पादुकांचे आद्यपुजारी म्हणजे भैरवभट जेरे-पुजारी होते.
दत्तावतार नृसिंह सरस्वती यांनी वर्ष १४२२ ते १४३४ या १२ वर्षांच्या कालावधीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे वास्तव्य केले. तेथे त्यांनी तप:श्चर्या केली. यानंतर ते जेव्हा गाणगापूर येथे जाण्यास निघाले, तेव्हा भैरवभट यांच्या प्रार्थनेवरून त्यांनी औदुंबर वृक्षाखाली पादुकांची स्थापना केली. याच पादुकांची पहिल्यांदा म्हणजे गुरुद्वादशीला पूजा करण्यात आली. तोच आजचा दिवस होय. सध्या या पुजारी वर्गाची १७ वी पिढी कार्यरत आहे.