तळवडेत (राजापूर ) ऊस गाळप हंगामाचा आरंभ
राजापूर – उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांनी त्यांच्या विविध उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली आहे. एक मराठी उद्योजक म्हणून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असून, हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारत आहे, अशा शब्दांमध्ये माजी आमदार बाळ माने यांनी प्रसिद्ध उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कार्याचा गौरव केला.
तळवडे येथील पितांबरीच्या ऊस गाळप हंगामाचा आरंभ माजी आमदार माने यांच्या हस्ते झाला. या वेळी डॉ. छाया जोशी, भाजपच्या विधानसभा क्षेत्र सहसंपर्कप्रमुख उल्का विश्वासराव, तळवडेच्या सरपंच गायत्री साळवी, ऊस तज्ञ शिवराज इंगवले आदी उपस्थित होते.
प्रभुदेसाई यांनी ‘वर्षभरामध्ये १० सहस्र टन ऊस गाळप करण्याचा आपला मानस असून, त्याद्वारे येथील शेतकर्याला आर्थिक सक्षम करण्याचा आपला प्रयत्न रहाणार आहे,’ हे स्पष्ट केले. ऊस शेतीतज्ञ शिवराज इंगवले यांनी ऊस उत्पादक शेतकर्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रणव मुळ्ये यांनी केले.