निर्लज्ज नितीश !
महिला पुरुषांच्या बरोबरीला येण्यासाठी जरी त्यांना देशात ३३ टक्के आरक्षण दिले गेले असले, तरी प्रत्यक्षात पुरुष राजकारणी महिलांविषयी कुठल्या थराला जाऊन विचार करतात, हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दाखवून दिले. नितीश कुमार यांनी भर विधानसभेत महिलांविषयी अत्यंत अश्लील आणि किळसवाणे वक्तव्य केले. ते विधान सभ्य प्रसारमाध्यमांना छापता न येण्याजोगे होते. वृत्तवाहिन्यांनाही या विधानातील अश्लील शब्द गाळून ते दाखवावे लागले. बिहार राज्याची विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत जात-आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल मांडण्यात आला होता. ७ नोव्हेंबर या दिवशी या अहवालावर झालेल्या चर्चेला नितीश कुमार यांनी उत्तर दिले. त्यांचे म्हणणे होते की, जर महिला शिक्षित असतील, तर प्रजननदर न्यून होईल. हे सांगतांना नितीश कुमार यांनी पती-पत्नीमधील शारीरिक संबंधांचे हातवारे करून अत्यंत किळसवाणे वर्णन केले. त्याद्वारे त्यांना सांगायचे होते की, सुशिक्षित पत्नी गर्भधारणेची शक्यता टाळते. त्यामुळे जन्मदर घटला आहे; मात्र त्यांचे शब्द निर्लज्जपणाचे होते. यामुळे देशात सर्वत्र संताप व्यक्त होऊन त्यांच्यावर टीका होऊ लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नितीश कुमार यांच्यावर टीका केली, तर बिहारमधील भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्यागपत्राची मागणी केली. यानंतर कुठे नितीश कुमार जागे झाले. दुसर्या दिवशी त्यांनी विधानसभेत ‘मी क्षमा मागतो. मी माझे शब्द मागे घेतो. मी जे बोललो ते चुकीचे असेल किंवा माझ्यामुळे काही जण दुखावले असतील, तर मी क्षमा मागतो. माझ्या विधानावर कुणी टीका करत असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी स्वतःची निंदा करतो. यानंतरही माझ्यावर कुणी टीका केली, तर मी त्याचे अभिनंदन करतो’, अशा शब्दांत हात जोडून क्षमायाचना केली. एकदा धनुष्यातून सुटलेला बाण जसा परत घेता येत नाही, त्याप्रमाणे तोंडून निघालेले शब्द कधीही परत घेता येत नाहीत.
‘मी माझे शब्द मागे घेतो’, असे म्हणणे, ही केवळ मखलाशी आणि वेळ मारून नेण्यासाठी केलेले विधान असते. अशी सारवासारव केवळ राजकारण्यांनाच जमू शकते. यातून ७२ वर्षीय नितीश कुमार ‘महिलांप्रती कुठल्या प्रकारचे विचार करतात ?’, हे जगाला कळले. ही क्षमा मागतांना त्यांच्या चेहर्यावर पश्चात्ताप किंवा अपराधीपणा यांचा लवलेशही नव्हता, हे लक्षात घ्यायला हवे. यावरूनच ही क्षमायाचना किती वरवरची होती, हे स्पष्ट होते. या विधानावर महिला आयोगाने सध्या जरी केवळ आक्षेप घेतला असला, तरी अशांवर कठोर कारवाई करण्यासाठी आयोगाने प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून महिलांचा अशा प्रकारे अवमान करण्यास कुणी धजावणार नाही. तसे झाले नाही, तर महिलांना महिला आयोगाचा आधार वाटणार नाही. अर्थात् आजमितीस देशातील साधारण ६८ कोटी महिलांपैकी किती महिलांना महिला आयोगाचा आधार वाटतो ? हा प्रश्नच आहे. प्रत्येक मासाला लव्ह जिहादच्या शेकडो घटना घडूनही महिला आयोगाकडून त्याविरुद्ध ठोस कृती केल्याचे दिसत नाही. असो.
नितीश कुमार यांची क्षमायाचना खर्या अर्थाने चर्चेला आली, ती त्यांनी केलेल्या स्वयंनिंदेमुळे ! अशा प्रकारे ‘एका मुख्यमंत्र्याने स्वतःच्याच विधानाची स्वतःच निंदा करणे’, हे देशातील आतापर्यंतचे पहिले अणि एकमेव उदाहरण आहे. त्यांच्या या स्वयंनिंदेनेही बिहारी आणि देशातील जनतेचे समाधान झालेले नाही. त्यामुळे मुझफ्फरपूर येथील न्यायालयात नितीश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
सहयोग्यांकडून निलाजरे समर्थन !
एकीकडे नितीश कुमार विधानसभेत ओरडून सांगत होते की, ‘मी चुकलो आहे’, तर दुसरीकडे त्यांचे सहयोगी नेते त्यांच्या विधानाचे निलाजरे समर्थन करत होते. यात बिहारच्या माजी महिला मुख्यमंत्री राबडीदेवी सर्वांत पुढे होत्या, हे विशेष ! राबडीदेवी यांनी ‘नितीश कुमार यांच्या तोंडून चुकून बोलले गेले’, अशा शब्दांत त्यांची वकिली केली. राबडीदेवी यांचे पुत्र आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी तर त्याही पुढे जाऊन ‘नितीश कुमार यांच्या विधानाकडे लैंगिक शिक्षणाच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे’, असा ‘अफलातून’ दृष्टीकोन दिला. बिहारमधील जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांनी ‘नितीश कुमार काय चुकीचे बोलले ?’, असा निलाजरा उलट प्रश्न उपस्थित केला, तर राज्यातील मंत्री श्रवण कुमार यांनी ‘नितीश कुमार सर्वसामान्य लोकांना कळेल, असे बोलले’, अशा आशयाचे विधान केले. यावरून बिहारमधील राजकीय पक्षांच्या नेत्यांची मानसिकता किती खालावली आहे ? हे लक्षात येते. अशांच्या राज्यात महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ? एवढेच नव्हे, तर देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘इंडिया’ नावाच्या आघाडीतील (ज्यात नितीश कुमार यांच्या पक्षाचाही समावेश आहे) एकाही नेत्याने नितीश कुमार यांच्या विधानाविषयी चकार शब्दही काढलेला नाही, हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे.
जनताच वठणीवर आणेल !
शिक्षित आणि अशिक्षित महिलांमधील भेद सांगणारे नितीश कुमार हे सोयीस्करपणे विसरले की, गेल्या ३ दशकांपासून बिहारवर लालू प्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल अन् नितीश कुमार यांचा जनता दल (सेक्युलर) यांचेच राज्य आहे. तरीही आज देशात बिहार हेच सर्वाधिक गरीब राज्य आहे. या कालावधीत ‘बिहारमधील महिलांमध्ये साक्षरता आणून गरिबी का हटवू शकले नाहीत ?’, याचे उत्तर त्यांनी जनतेला दिले पाहिजे. एकूणच नितीश कुमार दायित्वशून्यतेने वागले असले, तरी जनता मात्र दायित्वाने वागून येत्या निवडणुकीत अशा राजकारण्यांना त्यांच्या दायित्वाचे भान करून देईल, यात शंका नाही ! असे झाल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार यांच्या विरोधात उसळलेला जनक्षोभ त्यांची बोबडी वळवणारा ठरेल, यात शंका नाही.
विधानसभेत अश्लील हावभाव करून दायित्वशून्य विधाने करणारे मुख्यमंत्रीपदी असणे, ही लोकशाहीची शोकांतिका ! |