Diwali-Dhantrayodashi : धनत्रयोदशी (यमदीपदान)
सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा. कणकेत हळद घालावी. बाजूला दोन्हीकडे मुटकुळे ठेवावेत. दिव्याला नमस्कार करून पुढील श्लोक म्हणावा. त्यामुळे अपमृत्यू टळतो.
मृत्युना पाशदण्डाभ्यां कालेन श्यामया सह ।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ॥
अर्थ : त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा, काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ दे.
या दिवशी घरातील सर्व धन आणि तिजोरी यांची पूजा करावी. तिच्यावर ‘शुभ लाभ’ असे लिहावे. (साभार : ‘आनंदी ज्योतिष’, वर्ष २०१७)
धनत्रयोदशीला, म्हणजेच आश्विन कृष्ण त्रयोदशीला यमराजाला प्रसन्न करण्यासाठी ‘दीपदान’ करतात. असे दीपदान केल्याने अपमृत्यू टळतो. दक्षिण दिशेला धनेे टाकून त्यावर कणकेचा दिवा दक्षिणेकडे ज्योत करून ठेवतात. दक्षिण ही यमाची दिशा आहे. केवळ याच दिवशी दक्षिणेकडे मुख करून दिवा ठेवता येतो. या दीपदानाने आपल्या कुटुंबातील अपमृत्यू टळतो. यमराज म्हणाला, ‘‘आश्विन कृष्ण त्रयोदशीला जो कुणी मला दीपदान देईल आणि प्रदोषकाळी दीपोत्सव करील, त्याला कधीही अपमृत्यू येणार नाही.’’ यमदेवतेच्या या आशीर्वादाप्रमाणे धनत्रयोदशीला दीपदान आणि दीपोत्सव यांची प्रथा चालू झाली. धनत्रयोदशीला घरातील द्रव्य आणि अलंकार इत्यादींची पूजा केली जाते. धनेे आणि गूळ एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो.
– प्रा. रवींद्र धामापूरकर, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.
(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक २०११)