बालवाडीतील विद्यार्थ्‍यांना पोषण आहार पुरवणार्‍या बचत गटांचे ६ मासांचे पैसे पुणे महापालिकेने थकवले !

पुणे – महापालिकेच्‍या शिक्षण मंडळाच्‍या बालवाड्यांना महिला बचत गटांच्‍या माध्‍यमातून पोषण आहार देण्‍यात येतो. यात १५० बचत गट असून ७५० हून अधिक महिला कार्यरत आहेत; मात्र मार्चपासून या बचत गटांचे देयक थकीत आहे. त्‍या संदर्भातील ठरावही महापालिका प्रशासनाने केला नाही. त्‍यामुळे बालवाडीतील मुलांना पोषण आहार देण्‍यासाठी दुकानदारांकडून धान्‍य, तेल हे उधार घ्‍यावे लागत आहे. हे थकीत देयक दिवाळीनंतर देण्‍याचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्‍यात येत आहे.

बालवाडीतील विद्यार्थ्‍यांना पोहे, उपीट, डाळखिचडी असा पोषण आहार देण्‍यात येतो. शालेय सुट्या वगळता प्रत्‍येक बचत गटाचे अनुमाने १५ सहस्र रुपये याप्रमाणे मागील ७ मासांचे देयक थकलेले आहे. याविषयी बचत गटांनी शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला असता, ‘अद्याप ठराव झालेला नाही’, असे त्‍यांना सांगण्‍यात येत आहे, तसेच वरिष्‍ठांना भेटू दिले जात नाही.

महापालिका आयुक्‍त विक्रमकुमार म्‍हणाले की, बचत गटांची देयके का दिली नाहीत ? याची माहिती घेत आहोत. देयके देण्‍यामध्‍ये काही अडचणी आल्‍या आहेत का ? किंवा बचत गटांकडून देयकांची पूर्तता झाली नसेल, तर त्‍याची पूर्तता करून त्‍वरित देयके देण्‍यात येतील. (आतापर्यंत देयके वेळेत दिली जातात की नाही ? हे का पाहिले नाही ? महापालिकेतील प्रत्‍येक विभागातील कामांवर कुणाचा अंकुश नाही का ? – संपादक)