पुणे येथे विनाअनुमती लावलेल्या फलकधारकांकडून ५ वर्षांचे शुल्क आकारणार ! – उपायुक्त माधव जगताप
पुणे – महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून शहरातील विज्ञापन फलकांची (होर्डिंग) पडताळणी करण्यात येणार आहे. जे विनाअनुमती विज्ञापन फलक आहेत त्यांना अनुमती देतांना मागील ५ वर्षांचे शुल्क वसूल केले जाईल. तर ज्या विज्ञापन फलक मालकांनी परवाना नुतनीकरण करून घेतलेला नाही, अशा १ सहस्र ५०० हून अधिक जणांना नोटिसा पाठवण्यात येत आहेत, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. जे नुतनीकरण करत नाहीत, त्यांच्यावर त्वरित कारवाई करा, असे आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत.
माधव जगताप यांनी सांगितले की, शहरामध्ये परवाना असलेले १ सहस्र ८२६ विज्ञापन फलक असून त्याचे प्रतिवर्षी नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. असे असूनही चालू वर्षामध्ये केवळ २४६ विज्ञापन फलक मालकांनी नुतनीकरण करून घेतले आहे. ज्यांनी अद्याप परवाना नुतनीकरण करून घेतला नाही त्यांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. (अशी मुदत का दिली जाते ? थेट कारवाई का केली जात नाही ? यामुळेच नुतनीकरण होत नाही, असेच म्हणावे लागेल ! – संपादक)
‘पुणे आऊटडोअर अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन’चे अध्यक्ष बाळासाहेब गांजवे म्हणाले, ‘‘परवाना नुतनीकरणासाठी २ मासांची मुदतवाढ दिली पाहिजे. विज्ञापन फलकधारकांनी मार्च २०२४ पर्यंतचे आकाशचिन्ह शुल्क भरले आहे; परंतु परवाना नुतनीकरण केले नाही, अशा फलकांना अनधिकृत ठरवू नये.’’