छत्रपती संभाजीनगर येथील बागेश्‍वर धामच्‍या दरबारात ९ मुसलमानांनी हिंदु धर्म स्‍वीकारला !

अहिल्‍यानगर येथील जमीर शेख कुटुंबियांतील सदस्‍यांनी दीक्षा घेतली !

हिंदु धर्माचा स्‍वीकार करतेवेळी उपस्‍थित असलेले जमीर शेख आणि त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍य

छत्रपती संभाजीनगर – येथे आयोजित श्री बागेश्‍वर धामचे धीरेंद्र शास्‍त्री महाराज  यांच्‍या कथेच्‍या समारोपप्रसंगी अहिल्‍यानगर येथील रहिवासी जमीर शेख यांच्‍या कुटुंबातील ९ सदस्‍यांनी ८ नोव्‍हेंबर या दिवशी शास्‍त्री यांच्‍या हस्‍ते दीक्षा घेत हिंदु धर्मात प्रवेश केला. ‘लहानपणापासून आपण हिंदु परंपरेनुसार पूजापाठ करत असून सनातन धर्मावरील श्रद्धेमुळे हे धर्मांतर करत आहे’, अशी भावना शेख यांनी व्‍यक्‍त केली. आपण दोन्‍ही मुलींचे विवाह हिंदु धर्मात करून दिले आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

व्‍यवसायाने कामगार असलेले शेख लहानपणापासून हिंदु परंपरेनुसार पूजापाठ करत आहेत. त्‍यांना हिंदु धर्म स्‍वीकारायचा होता. त्‍यासाठी काही कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातून त्‍यांना या कार्यक्रमात या धर्मांतराची संधी मिळाली. या धर्मांतरासाठी आपल्‍यावर कोणताही दबाव नाही, असे शेख यांनी स्‍पष्‍ट सांगितले. हिंदु धर्माचा स्‍वीकार केल्‍यानंतर जमीर यांनी स्‍वत:चे नाव शिवराम आर्य, पत्नीचे सीता आणि मुलांसाठी बलराम, कृष्‍ण, सई, माई, अश्‍विनी, अंजना आणि प्रेरणा ही नावे ठेवली आहेत.

शिवराम आर्य (पूर्वीचे जमीर शेख) म्‍हणाले, ‘‘मला ५ मुलीच होत्‍या. मुलगा होण्‍यासाठी ‘श्रीकृष्‍ण गोविंद हरे मुरारी’ हे भजन गायले. कृष्‍णाला अभिषेकही घातला. श्रावण मासात मला मुलगा झाला. माँ शेरावाली प्रसन्‍न आहे.’’