पुणे येथील रेल्वेच्या जागेतील अवैध संस्थेत मुलींवर अत्याचार !
रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार मुख्य सूत्रधार !
पुणे – अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील अनिल पवार या हवालदाराने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. हवालदाराने रेल्वेच्या जागेत अवैध ‘सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्था’ चालू केली आहे. या संस्थेत हवालदाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. हवालदाराने साथीदारांच्या साहाय्याने रेल्वेस्थानकावर पळून आलेल्या आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याचा संशय असून या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्यात येत आहे, तसेच हवालदार अनिल पवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवार पसार झाला असून त्याचा लोहमार्ग पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. यापूर्वी या प्रकरणात कमलेश तिवारी याला अटक करण्यात आली होती.
Pune RPF Jawan Rape Case | प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या 17 वर्षीय तरूणीवर RPF जवानाकडून बलात्कार, पाच दिवस डांबून केले अत्याचार#CRPF #Pune #crime #Maharashtra https://t.co/hf7SZQD4ST
— Navarashtra (@navarashtra) November 1, 2023
लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणात सुश्मिता कसबे आणि करण राठोड यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वेस्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत होती.
संपादकीय भूमिका :रेल्वेच्या जागेत अवैध संस्था चालू होईपर्यंत रेल्वे प्रशासन काय करत होते ? अशा प्रकारे अवैध संस्था काढून सुरक्षादलातील हवालदारच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत असतील, तर महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ? अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! |