सिंधुदुर्ग : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला मारहाण
संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
सावंतवाडी : येथील उपजिल्हा (कुटीर) रुग्णालयात कार्यरत असलेले सुरक्षारक्षक प्रशांत वाडकर यांना ७ नोव्हेंबरच्या रात्री एका युवकाने अमानुष मारहाण केली. या मारहाणीत वाडकर गंभीर घायाळ झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळी, गोवा येथील सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या रुग्णालयात ७ नोव्हेंबरच्या रात्री दुचाकीच्या अपघातात घायाळ झालेल्या एका रुग्णाला भरती करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार चालू असतांना त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनी ‘रुग्णवाहिका बोलवा’, असे सांगितले. याचा राग येऊन संबंधित युवकाने मारहाण केल्याचे वाडकर यांचे म्हणणे आहे.
‘अशा प्रकारे कर्मचार्यांवर आक्रमण करणे योग्य नाही. या प्रकरणाची रुग्णालय प्रशासनाने गंभीर नोंद घेतली असून रुग्णालयास पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे’, अशी मागणी करण्यात आल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी सांगितले.
‘या रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकाला मारहाण करणार्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा, अन्यथा सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू’, अशी चेतावणी सुरक्षारक्षकांच्या वतीने विजय गुरव यांनी दिली.