गोवा : मंदिरातील चोरीच्या प्रकरणी आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा वरिष्ठ न्यायालयाकडून कायम
मडगाव, ८ नोव्हेंबर (वार्ता.) : दक्षिण गोव्यात पोडके, बाळ्ळी येथील श्री सतीदेवी मंदिराची दानपेटी फोडून आतील रक्कम चोरल्याच्या प्रकरणी संशयित सुदन गोंदलेकर (वय ४२ वर्षे) याला कनिष्ठ न्यायालयाने ठोठावली शिक्षा मडगाव येथील सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.
श्री सतीदेवी मंदिरात १९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी दानपेटी फोडून आतील ११ सहस्र ८१० रुपये चोरीला गेले होते. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित सुदन याच्या विरोधात गुन्हा नोंद करून न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले होते. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी संशयिताला दोषी ठरवून ३ मास कारावास आणि १ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला होता, तसेच चोरीला गेलेली रक्कम निर्णयाला आव्हान देण्याच्या मुदतीनंतर देवस्थानकडे सुपुर्द करावी, असे आदेशात म्हटले होते. संशयिताने न्यायालयाच्या या निवाड्याला मडगाव येथील सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयात संशयिताच्या आव्हान अर्जावर सुनावणी होऊन कनिष्ठ न्यायालयाचा निवाडा कायम ठेवण्यात आला आहे. संशयिताला शिक्षा भोगण्यासाठी कह्यात घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.