सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड पावसाने जनजीवन विस्कळीत !
कोल्हापूर – ८ नोव्हेंबरला सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पहाटेपासूनच चालू झालेल्या प्रचंड पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. कोल्हापूर शहरासह राधानगरी तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. पेठवडगावसह किणी, वाठार, भादोले परिसरात झालेल्या पावसाने ठिकठिकाणी तळ्यांचे स्वरूप आले होते. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने दिवसभर वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. रेल्वेस्थानकाजवळ पारेख पुलापाशी पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात होते की, तेथील रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. ऐन दीपावलीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसाने व्यापारी-भाजीविक्रेते आणि खरेदीसाठी आलेले नागरिक यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
सांगली शहरात स्टेशन चौक, राममंदिर परिसर, बसस्थानक परिसर येथे तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरासह अनेक उपनगरांतही गटारी आणि नाले तुंबल्याने भुयारी गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरली होती. काढणीला आलेल्या भातपिकाची, तसेच फुले येत असलेल्या आणि कोवळे मणी सिद्ध होण्याच्या अवस्थेतील द्राक्ष पिकाची अवकाळी पावसाने मोठी हानी होणार आहे.