सेवेची तीव्र तळमळ असणार्या फोंडा (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. लतिका पैलवान (वय ६५ वर्षे) !
फोंडा (गोवा) येथील सौ. लतिका पैलवान (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६५ वर्षे) यांचा आश्विन कृष्ण एकादशी (९.११.२०२३) या दिवशी वाढदिवस आहे. त्यांच्या समवेत सेवा करतांना त्यांच्या सहसाधिका सौ. जयश्री सारंगधर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. लतिका पैलवान यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. सहजता
‘सौ. लतिका पैलवानकाकू स्वतः मुख्याध्यापिका होत्या; पण त्या या गोष्टीची कधीही जाणीव करून देत नाहीत.
२. नम्रता
अध्यात्मप्रसार करतांना एखादी व्यक्ती नकारात्मक बोलली, तरी काकू त्या व्यक्तीला साधनेच्या स्तरावर हाताळतात आणि नम्रपणे आपला उद्देश सांगतात.
३. सेवेची तीव्र तळमळ
सौ. पैलवानकाकूंना मागील ११ वर्षांपासून हृदयविकार आणि पाठदुखी हे त्रास आहेत. असे असूनही अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना काकू कधीही सवलत घेत नाहीत. त्या ‘आज माझे काही दुखत आहे’, असे कधी म्हणत नाहीत. गोव्यात रस्त्याला चढ-उतार आहेत. त्यांना मी ‘‘तुम्ही खाली थांबा’’, असे म्हटल्यावर त्या म्हणतात, ‘‘आपण दोघीही जाऊ’’, तसेच ऊन किंवा कितीही पाऊस असला, तरीही काकू सेवेलाच प्राधान्य देतात.
४. सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करणे
काकू खाली भूमीवर बसून सेवा करतात. भाजी निवडण्यापूर्वी सर्व साहित्य घेऊन बसतात, तसेच सेवा झाल्यावर पुन्हा सर्व साहित्य जागच्या जागी ठेवतात. सेवेसाठी जी वेळ दिली आहे, त्या वेळेत ती सेवा पूर्ण करून नंतरच जेवायला जातात.
५. सेवा करतांना त्यांना एखाद्या साधकाची चूक लक्षात आल्यास, त्या तत्परतेने त्या साधकाला त्याची चूक लक्षात आणून देतात.
‘गुरुदेवांच्याच कृपेने मला सौ. पैलवानकाकूंमधील गुणवैशिष्ट्ये लक्षात आली, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. जयश्री सारंगधर, फोंडा, गोवा. (१३.८.२०२३)