कराड स्फोट प्रकरणी पोलिसांचे अन्वेषण असमाधानकारक ! – आमदार नितेश राणे
कराड, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – मुजावर कॉलनी येथे झालेल्या भीषण स्फोटात पोलीस ज्या पद्धतीने अन्वेषण करत आहेत, त्याविषयी आम्ही समाधानी नाही. कराड आणि सातारा परिसरात मागील काही घटनांमध्ये हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना पाकिस्तानातून धमक्यांचे दूरभाष येत होते. ‘पी.एफ्.आय.’च्या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या) घडामोडी वाढत चाललेल्या आहेत. मोहरमच्या मिरवणुकीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद), अशा घोषणा देण्यात आल्या. पोलीस प्रशासन नेमके कुणाला संरक्षण देऊ पहाते ? पोलिसांवर स्थानिक पुढार्यांचा दबाव आहे का ? स्फोटाची तीव्रता पहाता याचे आतंकवादविरोधी पथकाच्या वतीने उच्चस्तरीय अन्वेषण होणे आवश्यक आहे, असे परखड प्रतिपादन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तत्पूर्वी आमदार राणे यांनी येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करून मुजावर कॉलनीत घटनास्थळी भेट देऊन पीडित हिंदु कुटुंबियांची विचारपूस केली, तसेच येणार्या हिवाळी अधिवेशनामध्ये या घटनेविषयी आवाज उठवणार असल्याचे मत आमदार राणे यांनी व्यक्त केले.
या वेळी पत्रकार परिषदेमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. सागर आमले, श्री. केदार डोईफोडे, हिंदु एकता आंदोलनाचे सातारा जिल्हा संघटक श्री. अजय पावसकर, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष श्री. राहुल यादव, कराड शहराध्यक्ष श्री. प्रकाश जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल कडणे, श्री. मदन सावंत, श्री. मनोहर जाधव, सनातन संस्थेचे श्री. चिंतामणी पारखे, धर्म जागरण समन्वयक श्री. पवन पाटील, गोरक्षक श्री. वैभव जाधव, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल खुंटाळे आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.