महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दूरदृश्यप्रणालीद्वारे ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रमांचे उद़्घाटन !
मुंबई – महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ चालू करण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवसाच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्रालयामध्ये या कार्यक्रमांचे उद़्घाटन झाले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांसह मंत्रीमंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
याविषयी मनोगत व्यक्त करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबवण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक घटकापर्यंत पोचवत आहोत. दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत आपण पोचलो आहोत. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी कार्यवाही व्हावी, यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा.
शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी.’’ या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातील ५ व्या स्थानावर नेले आहे. या धर्तीवर राज्यातही सर्व घटकांचा विकास करून राज्याला विकासाच्या पथावर नेण्याचा मानस या उपक्रमातून आपण साध्य करत असल्याचे म्हटले.