मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरूंना घेराव, विदुषकाचे मास्क घालण्याचा प्रयत्न !
सिनेट निवडणुकीवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक !
मुंबई – मुंबई विद्यापिठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीवरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सिनेट निवडणूक मतदारसूची आणि निवडणुकीच्या सूत्रावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना घेराव घातला. या वेळी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना विदुषकाचे मास्क घालण्याचा प्रयत्न केला. सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याची चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिली आहे.
मुंबई विद्यापिठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलल्याने आणि नव्याने मतदार नोंदणी करावी लागत असल्याने मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने आक्रमक होत कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेतली. या वेळी मतदार नोंदणीसह मुंबई विद्यापिठाच्या काही निर्णयावर सेनेनेे अप्रसन्नता व्यक्त केली. शिष्टमंडळाने कुलगुरूंविरोधात घोषणा दिल्या आणि त्यांना विदुषकाचे मास्क घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विद्यापिठाच्या सुरक्षा कर्मचार्यांनी कार्यकर्त्यांना अटकाव केला. सिनेट निवडणुकीत नव्याने मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून तुमचे पुतळे जाळू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिली आहे. या वेळी मनसेचे नेते गजानन काळे, अखिल चित्रे, सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे, यश सरदेसाई उपस्थित होते.