मुंबई येथे श्रीराम मंदिर लोकार्पणाच्या अक्षता कलशांचे सहस्रो भक्तांच्या उपस्थितीत स्वागत !
मुंबई, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – अलीकडेच अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात साधूसंतांच्या उपस्थितीत मंत्रघोषाच्या साक्षीने मंत्रित झालेल्या अक्षता कलशांचे आगमन पुष्पक एक्सप्रेसने नुकतेच मुंबई येेेथे झाले. विश्व हिंदु परिषदेचे कोकण प्रांतमंत्री आणि अभियानाचे प्रमुख मोहन सालेकर यांनी सहस्रो रामभक्तांच्या उपस्थितीत अक्षता कलशांचा स्वीकार केला.
अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे लोकार्पण २२ जानेवारी २०२४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदूच्या घरी अक्षता देऊन या भव्य सोहळ्याचे आमंत्रण दिले जाणार आहे. अक्षता कलशाची दादर (पूर्व) हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘जय श्रीराम’, ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या प्रचंड जयघोषात निघालेली यात्रा सायन कोळीवाडा येथील हनुमान मंदिरात संपली.
मोहन सालेकर म्हणाले की, प्रत्येक श्रीराम भक्ताच्या घरी जाऊन पूजलेल्या अक्षता, प्रभु श्रीरामाचे चित्र आणि जवळच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची योजना आहे. कोकण प्रांतातील २० लाख हिंदूंच्या घरी १ ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत संपर्क करण्यात येईल. २२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीरामभक्तांनी आपल्या रहात्या ठिकाणच्या मंदिरात सकाळी ११ ते दुपारी १ या काळात भजन, कीर्तन, नामजप करून आनंद उत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी कोकण प्रांत बजरंग दल सहसंयोजक रणजीत जाधव, विभागमंत्री राजेंद्र चौबे, प्रांत समरसता प्रमुख नरेश पाटील, प्रांत सहमंत्री अनिरुद्ध भावे आदींची विशेष उपस्थिती होती. शेवटी सामुदायिक आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. अक्षता कलश हनुमान मंदिरात पूजनासाठी ठेवण्यात आले.