रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेनिमित्त असतांना मुंबई येथील श्री. महेश मधुकर पेडणेकर यांना आलेल्या अनुभूती
१० ते २५.६.२०२३ या कालावधीत ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’संबंधी सेवेनिमित्त मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. रात्री झोपण्यापूर्वी भावजागृतीचा प्रयोग करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूच्या रूपात शेषनागावर पहुडले आहेत’, असे दिसणे आणि अंतरंगात शांती अनुभवणे
मी आश्रमात असतांना रात्री झोपण्याच्या वेळी ‘विष्णुलोकात झोपत आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग करत असे. २३.६.२०२३ या दिवशी नेहमीप्रमाणे मी भावजागृतीचा प्रयोग करत असतांना मला दिसले, ‘गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) साक्षात् श्रीविष्णुरूपात शेषनागावर शांतपणे पहुडले आहेत. गुरुमाऊलींचे डोळे मिटलेले आहेत. त्या वेळी ‘गुरुमाऊली श्वास घेत असतांना (जसे पोट वर-खाली होते तसे) रामनाथी आश्रमाच्या वास्तूचीही हालचाल होत आहे.’ या वेळी भावजागृतीचा प्रयोग करतांना मी पूर्णपणे जागृतावस्थेत होतो. मी असे ३० मिनिटांहून अधिक काळ अनुभवले. तेव्हा मला अंतरंगात पुष्कळ शांती जाणवत होती. त्यानंतर मी गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून झोपलो.
२. ध्यानमंदिरात आरतीसाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीसमोर उभा असतांना आलेल्या अनुभूती
२ अ.‘देवीच्या हातांतील शस्त्रे आणि वस्तू यांतून विविध देवतांची तत्त्वे प्रक्षेपित होत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे : २४.६.२०२३ या दिवशी सकाळी मी आश्रमातील ध्यानमंदिरात आरतीसाठी गेलो होतो. आरतीच्या वेळी मी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीसमोर उभा होतो. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्री दुर्गादेवीच्या हातांतील शस्त्रे आणि वस्तू यांतून विविध देवतांची तत्त्वे प्रक्षेपित होत आहेत.’
२ आ. श्री दुर्गादेवीचा आशीर्वाद देणारा हात : त्या माध्यमातून ‘सर्व देवता आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.
२ इ. श्री दुर्गादेवी आरूढ असलेला सिंह : ‘सिंहाच्या जबड्यातून माझ्यावर उपाय होत आहेत’, असे मला जाणवले. मला जांभया येत होत्या.
३. मी ध्यानमंदिरात आरतीसाठी गेल्यावर मला १० ते १५ जांभया येत असत आणि नंतर मला हलकेपणा जाणवत असे.
– श्री. महेश मधुकर पेडणेकर, मालाड, मुंबई. (५.७.२०२३)
|