दीपोत्‍सव म्‍हणजे ज्ञानाच्‍या जाणिवेने दिवाळीचा सण साजरा करणे !

ज्ञानाचा दिवा हृदयात लावणे, म्‍हणजे निश्‍चित प्रकारच्‍या जाणिवेने दिवाळीचा सण साजरा करणे !

दीपोत्‍सव म्‍हणजे आनंदाचा उत्‍सव. दीपोत्‍सव हा केवळ उत्‍सव नाही, तर उत्‍सवांचे स्नेहसंमेलन आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, दिवाळीपासून चालू होणारे नवे आर्थिक वर्ष (बलीप्रतिपदा) आणि भाऊबीज, असे ५ उत्‍सव म्‍हणजे दीपावली !

१. धनत्रयोदशी

धनत्रयोदशी म्‍हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. भारतीय संस्‍कृतीने कुणालाही तुच्‍छ किंवा त्‍याज्‍य मानण्‍याची चूक कधी केली नाही. लक्ष्मीला आई समजून तिला पूजनीय मानली आहे. वैदिक ऋषींनी तर लक्ष्मीला उद्देशून म्‍हटलेले आहे.

‘ॐ महालक्ष्म्‍यै च विद्महे विष्‍णुपत्‍न्‍यै च धीमहि ।
तन्‍नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥’

अर्थ : आम्‍ही महालक्ष्मीला जाणतो, विष्‍णुपत्नीचे ध्‍यान करतो, ती लक्ष्मी आमच्‍या बुद्धीला सत्‍प्रेरणा देवो.

‘सुईच्‍या छिद्रातून उंट निघून जाईल; पण श्रीमंताला स्‍वर्ग मिळणार नाही’, या ख्रिस्‍ती धर्माच्‍या विधानाशी भारतीय विचारधारा सहमत नाही. भारतियांच्‍या दृष्‍टीने ‘धनवान लोक भगवंताचे लाडकी मुले आहेत’, असे म्‍हटले जाते.

‘शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्‍टोऽभिजायते ।’ (श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, अध्‍याय ६, श्‍लोक ४१),  म्‍हणजे ‘योगभ्रष्‍ट पुरुष शुद्ध आचरण असणार्‍या श्रीमंतांच्‍या घरात जन्‍म घेतो.’
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्‍यां हिरण्‍यं प्रभूतं गावो दास्‍योऽश्‍वान्‍विन्‍देयं पुरुषानहम् ॥

                                                – श्रीसूक्‍त, ऋचा १५

अर्थ : हे अग्‍ने, मला कधीही नष्‍ट न होणारी लक्ष्मी प्रदान कर, जिच्‍या आगमनाने मला पुष्‍कळ धन, गायी, दास-दासी, घोडे आणि पुत्र प्राप्‍त होवोत.

२. नरकचतुर्दशी

नरकचतुर्दशीला कालीचतुर्दशीही म्‍हणतात. नरकचतुर्दशीची कथा अशी आहे, ‘प्राग्‍यज्‍योतिषपुराचा राजा नरकासुर शक्‍तीमुळे सैतान बनला होता. स्‍वतःच्‍या शक्‍तीने तो सर्वांना त्रास देत होता. एवढेच नाही, तर सौंदर्याचा शिकारी असा तो स्‍त्रियांनाही सतावत होता. त्‍याने स्‍वतःच्‍या जनानखान्‍यात १६ सहस्र कन्‍यांना कैद करून ठेवले होते. भगवान श्रीकृष्‍णाने त्‍याचा नाश करायचा विचार केला. स्‍त्री उद्धाराचे हे काम असल्‍यामुळे सत्‍यभामेने नरकासुराचा नाश करण्‍याचा विडा उचलला. श्रीकृष्‍ण साहाय्‍याला आले. चतुर्दशी दिवशी नरकासुराचा नाश झाला. त्‍याच्‍या त्रासातून मुक्‍त झालेल्‍या लोकांनी उत्‍सव साजरा केला. अमावास्‍येच्‍या अंधार्‍या रात्री दिवे लावून तिला त्‍यांनी प्रकाशित केले. असुराच्‍या नाशाने आनंदित झालेले लोक नवीन वस्‍त्रे नेसू लागले.’

३. लक्ष्मीपूजन म्‍हणजेच चांगल्‍या लोकांच्‍या हातात रहाण्‍यामागील महत्त्व !

लक्ष्मी चंचल नाही, तर लक्ष्मीवान मानवाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्‍ती आहे. त्‍याने मानव देवही बनू शकतो किंवा दानवही होऊ शकतो. लक्ष्मीला भोगप्राप्‍तीचे साधन समजणारा मानव पतनाच्‍या खोल गर्तेत गडगडत जातो, तर लक्ष्मीचे मातृवत् पूजन करून तिला प्रभूचा प्रसाद समजणारा मानव स्‍वतः पवित्र बनून सृष्‍टीला पावन करतो. विपरीत मार्गाने वापरली जाते ती लक्ष्मी स्‍वार्थासाठी वापरली जाते. ते वित्त, परार्थे वापरली जाते ती लक्ष्मी आणि प्रभुकार्यात वापरली जाते ती महालक्ष्मी ! महालक्ष्मी हत्तीवर बसून वाजत गाजत येते. हत्ती हा औदार्याचे प्रतीक आहे. सांस्‍कृतिक कार्यात उदार हाताने पैसे व्‍यय करणार्‍याच्‍या घरात ती पिढ्यान् पिढ्या राहिलेली आहे. रघुवंश यांचे ज्‍वलंत उदाहरण आहे. लक्ष्मी ही एक महान शक्‍ती असल्‍यामुळे ती चांगल्‍या लोकांच्‍या हातातच राहिली पाहिजे. त्‍यामुळे त्‍याचा उपयोग होतो.

४. बलीप्रतिपदा (दिवाळी)

दिवाळी म्‍हणजे वैश्‍यांचा (व्‍यापार्‍यांचा) वह्या पूजनाचा दिवस ! संपूर्ण वर्षाचा आढावा घेण्‍याचा दिवस !! या दिवशी मानवाने जीवनाचाही आढावा घेतला पाहिजे. राग-द्वेष, वैरभाव, ईर्षा, मत्‍सर किंवा जीवनातील कटुता दूर करून नव्‍या वर्षाच्‍या दिवशी जुने प्रेम, श्रद्धा आणि उत्‍साह यांकडे लक्ष दिले पाहिजे.

नव्‍या वर्षाला ‘बलीप्रतिपदा’ म्‍हणतात. तेजस्‍वी वैदिक विचारांची उपेक्षा वर्णाश्रम व्‍यवस्‍था उद़्‍ध्‍वस्‍त करणार्‍या बलीचा वामनाने पराभव केला. त्‍याच्‍या बलीप्रतिपदेचा उत्‍सव साजरा होऊ लागला. बली दानशूर होता. त्‍याच्‍या गुणांचे स्‍मरण नवीन वर्षाच्‍या दिवशी आपल्‍याला वाईट माणसांत असलेले प्रभुत्‍व पहाण्‍याची दृष्‍टी देते. कनक (सोने) आणि कांता (सुंदर महिला) यांच्‍या मोहात अंध बनलेला माणूस असुर बनतो.

५. भाऊबीज

दिवाळीच्‍या दिवशी कनक, म्‍हणजे लक्ष्मीकडे पहाण्‍याची पूज्‍य दृष्‍टी जोपासण्‍याचे शिक्षण आणि भाऊबिजेच्‍या दिवशी समस्‍त स्‍त्री जातीकडे आई किंवा बहिण या दृष्‍टीने पहाण्‍याचे शिक्षण घ्‍यायचे. स्‍त्री ही पूज्‍य आहे. ती मातृदृष्‍टी देणारी संस्‍कृती असून तीच मानवाला विकारांसमोर स्‍थिर रहाण्‍याची शक्‍ती देऊ शकते.

(साभार : मासिक ‘हरी-विजय’, दिपोत्‍सव २००८)

दीपोत्‍सव म्‍हणजे स्‍वतःच्‍या हृदयात ज्ञानाचा दिवा लावणे !

दिवाळी म्‍हणजे दीपोत्‍सव बाहेर दिवे पेटवायचेच; पण खरा दिवा हृदयात पेटला पाहिजे. हृदयात जर अंधार असेल, तर बाहेर पेटवलेल्‍या सहस्रो पणत्‍या निरर्थक आहेत. दिवा हे ज्ञानाचे प्रतिक आहे. हृदयात दिवा लावणे, म्‍हणजे निश्‍चित प्रकारच्‍या जाणिवेने दिवाळीचा सण साजरा करणे. धनत्रयोदशीच्‍या दिवशी वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थक करण्‍याची शक्‍ती मानून महालक्ष्मीची पूजा करायची. नरकचर्तुदशीच्‍या दिवशी जीवनात नरक निर्माण करणारा आळस, प्रमाद (निष्‍काळजी), अस्‍वच्‍छता, अनिष्‍टता वगैरे नरकासुरांना मारणे. दिवाळीच्‍या दिवशी ‘तमसो मा ज्‍योतिर्गमय ।’ म्‍हणजे ‘मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने’, अशा या मंत्राची साधना करता करता जीवनपथ प्रकाशित करायचा. जीवनाच्‍या वहीत आढावा घेतांना जमेच्‍या बाजूला ईशकृपा रहावी, यासाठी प्रभुकार्याने जीवन भरून काढायचे.’

(साभार : मासिक ‘हरी-विजय’, दिपोत्‍सव २००८)