भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व दर्शवणारी दीपावली !
‘दीपावली हे ज्योतीपर्व असून या काळात घरोघरी दीप वा दीपमाळा लावल्या जातात. दीपावली हे आमचे प्राचीन आणि प्रमुख पर्व आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या काळीही हे पर्व साजरे केले जायचे. याचे पुराणामध्येही उल्लेख आहेत.
आपल्या देशाच्या नावाचा, म्हणजेच ‘भारत’ या शब्दाचा अर्थच हा आहे की, प्रकाशामध्ये (ज्ञानामध्ये) आसक्त असा देश ! भा, आभा, विभा, प्रभा, कशाची ? तर ज्ञानज्योतींची ! यामध्ये रत असलेला तो ‘भारत !’
असे हे ज्योतीपर्व आम्हा सर्व भारतियांसाठी महापर्व आहे, यात संदेहच नाही. ज्योतीची उपासना ही भारताची विश्वाला अनमोल देणगी आहे. आमच्या देशाची मूळ प्रार्थनाच आहे, ‘तमसो मा ज्योतिर्गमय ।’ म्हणजेच ‘मला अंधःकारातून (अज्ञानातून) मुक्त करून ज्योतीने, म्हणजेच ज्ञानशक्तीने युक्त कर.’ या प्रार्थनेचे स्मरण रहावे; म्हणून आमच्या ऋषिमुनींनी दीपावलीचे आयोजन केलेले आहे.