कोकण रेल्वेमार्गावर ९ आणि १० नोव्हेंबरला ‘मेगा ब्लॉक’
रत्नागिरी – ९ आणि १० नोव्हेंबर या दिवशी कोकण रेल्वे मार्गावरील कुमटा ते भटकळ आणि रत्नागिरी ते वैभववाडी रोड या रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाच्या अन् मालमत्तेच्या देखभालीसाठी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील काही गाड्यांच्या प्रवासावर परिणाम होणार आहे.
या मार्गावरील कुमटा-भटकळ येथे ९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत ३ तासांचा मेगा ब्लॉक असल्याने गाडी क्र. १६५८५ बेंगळुरू ते मुर्डेश्वर एक्सप्रेसचा प्रवास ८ नोव्हेंबर या दिवशी भटकळ स्थानकावर अल्पकाळ थांबेल आणि भटकळ ते मुर्डेश्वर स्थानकादरम्यान अंशतः रहित करण्यात येईल.
रत्नागिरी ते वैभववाडी रोड येथे १० नोव्हेंबर या दिवशी सकाळी ८.३० ते ११ असा मेगाब्लॉक आहे. गाडी क्र. १६३४६ थिरूवनंतपुरम् सेंट्रल ते एलटीटी नेत्रावती एक्सप्रेसचा प्रवास ९ नोव्हेंबर या दिवशी उडुपी ते कणकवली विभागादरम्यान अडीच तासांसाठी नियंत्रित केला जाईल. गाडी क्र.१०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्सप्रेसाचा प्रवास सावंतवाडी रोड ते कणकवली स्थानकांदरम्यान १० नोव्हेंबर रोजी ३० मिनिटांसाठी नियंत्रित केला जाईल.