तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून तुळजापूर येथे कौशल्य विकास विश्वविद्यालय चालू करण्याची मागणी !
धाराशिव – विविध कौशल्यांमध्ये पारंगत मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून तुळजापूर येथे ‘कौशल्य विकास विश्वविद्यालय’ चालू करण्याच्या मागणीसाठी विश्वस्त मंडळाच्या मान्यतेने शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना येथील भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मंडळाचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांना केली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील या वेळी म्हणाले की, राज्यातील युवकांना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे अन् त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याच्या हेतूने देशात कौशल्य विद्यापिठांची स्थापना करण्यात येत आहे. महाराष्ट्रात असलेले उद्योग समुहांचे जाळे आणि रोजगाराच्या प्रचंड संधी विचारात घेता येथे कुशल मनुष्यबळाची मागणी मोठी आहे. त्यामुळे उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण करून येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी विद्यापिठाची आवश्यकता आहे.
जिल्ह्याचे अर्थकारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून सातत्याने उद़्भवणार्या नैसर्गिक आपत्तींमुळे येथील दरडोई उत्पन्न अत्यंत अल्प आहे. औद्योगिकीकरण आणि सिंचन यांच्या अभावामुळे येथे रोजगारही अल्प आहे. येथील युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्यवृद्धी आवश्यक असून यासाठी कौशल्य विकास विद्यापीठ चालू करण्याचा विषय मंदिर संस्थानच्या बैठकीत घेऊन त्यास मान्यता द्यावी, तसेच हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. यासाठी विख्यात विद्यापिठांसमवेत प्राथमिक चर्चा चालू आहे, असे त्यांनी सांगितले.