सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये होणार्या सर्व कार्यक्रमांना आता पूर्वअनुमती बंधनकारक !
पुणे – विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेल्या ३ दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घटनांमुळे विद्यापिठाचे नाव चर्चेत येत होते. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, विद्यापिठामध्ये शैक्षणिक वातावरण रहावे यांसाठी विद्यापीठ प्रशासनाने कठोर कार्यवाही चालू केली आहे.
विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये सभासद नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम आणि आंदोलने यांवर बंदी घातली आहे. या गोष्टी करण्यासाठी पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनाची पूर्वअनुमती बंधनकारक करण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्रसिद्ध केले आहे.
पूर्वअनुमतीविना कार्यक्रम आयोजित करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विद्यापिठामध्ये येणार्या प्रत्येकाची चौकशी, नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. वसतिगृहातील रहिवाशी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. (गुंडगिरी करणारे विद्यार्थी कधीतरी देशाचे जबाबदार नागरिक होऊ शकतील का ? – संपादक)