ShriRamCharitManas Allahabad High Court : श्रीरामचरितमानस योग्य संदर्भासह वाचले गेले पाहिजे ! – अलाहाबाद उच्च न्यायालय
श्रीरामचरितमानस जाळणारे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांची याचिका फेटाळली !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपिठाने श्रीरामचरितमानस या हिंदूंच्या पवित्र ग्रंथाच्या प्रती जाळण्याच्या कृत्यावरून समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे कान टोचले आहेत. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही ग्रंथावर अथवा अभिलेखावर कथन करतांना वास्तविक संदर्भ पाहूनच ते केले पाहिजे. ग्रंथांतील एखादा अंश सुसंगत तथ्यांचा विचार न करता मांडणे सत्य होऊ शकत नाही. काही वेळा हे असत्य कथनही होऊ शकते. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी मौर्य यांच्या विरोधात प्रविष्ट आरोपपत्राच्या विरोधात केलेली याचिका फेटाळत वरील भाष्य केले.
न्यायालयाने ३१ ऑक्टोबर या दिवशी संबंधित याचिका फेटाळली होती; परंतु त्याचा निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती विद्यार्थी म्हणाले की, कायदेशीर निर्णयांचा कोणताही अंश सुसंगत प्रावधानांचा आधार घेऊनच प्रस्तुत करता येतो. याप्रमाणेच जेव्हा श्रीरामचरितमानसमधील एखादी ओवी सविस्तरपणे सांगितली जाते, तेव्हा ती कुणी कोणत्या परिस्थितीत आणि कुणाला उद्देशून म्हटली आहे ?, हे पहायला हवे. श्रीरामचरितमानसवर श्रद्धा असणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ते जाळून धर्माचा अवमान करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकामौर्य हे सातत्याने हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. त्यामुळे त्यांचे केवळ कान न टोचता न्यायालयाने त्यांना शिक्षाच द्यायला हवी, असेच हिंदूंना वाटते ! |