युद्धानंतर इस्रायल गाझाचे संरक्षण करील ! – पंतप्रधान नेतान्याहू
काही घंट्यांच्या युद्धविरामाचेही केले सुतोवाच !
तेल अविव (इस्रायल) – हमासला नष्ट केल्यानंतर गाझामधील सुरक्षेचे दायित्व इस्रायलचे असेल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. तसेच ओलिसांची सुटका करण्यासाठी आणि पॅलेस्टिनींना साहाय्य करण्यासाठी काही काळ युद्ध थांबवण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आम्ही परिस्थितीची पहाणी करून आवश्यक असल्यास काही घंट्यांचा युद्धविराम घोषित करू शकतो.’ दुसरीकडे हमासने म्हटले की, तो जोपर्यंत गाझा पट्टीवर आक्रमण चालू राहील, तोपर्यंत आम्ही ओलिसांची सुटका करणार नाही.
सौजन्य: Oneindia News
कारवाई पूर्ण होण्यास वेळ लागणार !
इस्रायल संरक्षण दलाने सांगितले की, गाझामधील सैनिकी कारवाई पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे येणारा हिवाळा लक्षात घेऊन सैनिकांना आवश्यक वस्तू आणि गणवेश देण्यास प्रारंभ करण्यात आला असून हे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
आमच्या तळांना लक्ष्य केल्यावर गंभीर परिणाम होतील ! – अमेरिकेची धमकी
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात अमेरिका इस्रायलच्या पाठीशी उभी असल्याने लेबनॉन, इराक आणि तुर्कीये येथ असलेल्या अमेरिकच्या वायूदलाच्या तळांना स्थानिक मुसलमान नागरिकांकडून लक्ष्य करण्यात आले आहे. याविषयी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, अलीकडे आमच्या तळांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला आहे. हे थांबवले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतील. या देशांच्या सरकारांनी सतर्क रहायला हवे.
इस्रायली सैन्यात भारतातील २०० ज्यू !
भारतात रहाणार्या ज्यू समुदायातील अनुमाने २०० लोक इस्रायलच्या सैन्यात सहभागी होणार आहेत. यांतील ७५ लोक इस्रायलमध्ये पोचले आहेत. या सर्वांनी सैन्य प्रशिक्षण घेतलेले आहे. यांपैकी काही राखीव पदावर कार्यरत आहे. हे सर्व जण नेई मेनाशे समाजातील आहेत. शेवी इस्रायल नावाच्या संघटनेनेही ही माहिती दिली. ही संघटना जगाच्या विविध भागांत रहाणार्या इस्रायलींसाठी काम करते.