जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटनमंत्री
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर होणार
कोल्हापूर – कोल्हापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची दुरुस्ती, जतन आणि संवर्धन करून जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा. यासाठी भरीव निधीचे प्रावधान करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय बंदरे, जलमार्ग आणि पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. पुरातत्व विभागाकडे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांसाठी ९०० कोटी रुपयांचा आराखडा पुरातत्व विभागाने सिद्ध केला आहे. या आराखड्याविषयी केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकार्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्या प्रसंगी त्यांनी ही ग्वाही दिली.
या बैठकीसाठी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, माजी आमदार अमल महाडिक यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापूर येथील अनेक ठिकाणांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मी गोव्याचा असल्यामुळे कोल्हापूरशी माझी जवळीकता असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील.’’
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री जोतिबा मंदिर, तसेच रांगणा, पन्हाळा, विशाळगड आणि पारगड या ठिकाणांचे जतन, संवर्धन, दुरुस्ती अन् परिसर विकासासाठी कामे केली जाणार आहेत. यांसह जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण त्या त्या विभागप्रमुखांनी केले.