गोवा : कला अकादमी १० नोव्हेंबरला खुली होणार !

पणजी : गेल्या ३ वर्षांपासून नूतनीकरण चालू असलेली कला अकादमी १० नोव्हेंबरला जनतेसाठी खुली होणार आहे, अशी माहिती गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘खुले नाट्यगृह वगळता इतर सर्व भाग चालू करण्यात येतील. नूतनीकरण केलेली प्रतिष्ठित वास्तू २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार्‍या ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी वापरण्यात येईल.’’

(सौजन्य : Goa 365 TV) 

वर्ष २०२१ मध्ये कला अकादमी संकुलातील काही वास्तूंच्या नूतनीकरणाचे काम चालू करण्यात आले होते. यात खुल्या नाट्यगृहाचा सहभाग नव्हता. वर्ष २०२३ च्या जुलै मासात खुल्या नाट्यगृहाचे छप्पर कोसळले होते. खुल्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अद्याप चालू करण्यात आलेले नाही.

थिएटर आर्ट्स कॉलेज कला अकादमी संकुलात हालवणार नाही !

पूर्वी कला अकादमी संकुलात चालणारे ‘गोवा कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स’ हे महाविद्यालय सध्या फोंडा येथील रवींद्र भवनात कार्यरत आहे. ते पुन्हा कला अकादमी संकुलात आणले जाणार नाही, असे मंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले आहे. नूतनीकरणाच्या कामामुळे हे महाविद्यालय कला अकादमी येथून रवींद्र भवन येथे हालवण्यात आले होते. या महाविद्यालयात सध्या भारतीय आणि पाश्‍चिमात्य संगीत शिकणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कला अकादमी येथे गर्दी टाळण्यासाठी ‘थिएटर आर्ट्स कॉलेज’ नवीन स्थळी हालवले जाणार आहे. या शैक्षणिक वर्षात हे महाविद्यालय रवींद्र भवन, फोंडा येथे कार्यरत राहील.