हमासच्या युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळलेला मोठा डाव !
‘सध्या हमास आणि इस्रायल यांचे युद्ध जोशात आलेले आहे. सध्या येत असलेल्या बातम्यांनुसार हमासचे सर्व लढवय्ये हे शेपूट घालून कुठल्या तरी बिळातून किंवा भुयारातून जीव वाचवायला पळत आहेत. अनुमाने ५-६ लाखांहून अधिक लोक जीव वाचवण्यासाठी इस्रायलच्या आदेशानुसार उत्तर गाझामधून दक्षिण गाझामध्ये आले आहेत. गाझा आणि इजिप्त यांच्या सीमेवरील प्रवेशद्वार उघडण्यावरून आंतरराष्ट्रीय चर्चा झाली. एका बातमीनुसार अमेरिका आणि इजिप्त यांच्यात एक तडजोड झाली आहे. त्यानुसार या लोकांना निर्वासित म्हणून इजिप्तमध्ये तात्पुरते येऊ द्यावे, असे ठरले आहे. या युद्धात किती लोक मारले वा घायाळ झाले ? नासाडी किती झाली ? किती रॉकेट सोडले ? यांचे आकडे दिले जातात; पण यात पडद्याआडून ज्या हालचाली चालू आहेत, त्याचा वेध घेण्याचा सहसा प्रयत्न होत नाही. माझ्या दृष्टीने तोच महत्त्वाचा आहे. याचे कारण की, असे प्रथमच घडत आहे की, पूर्वी पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांचे युद्ध चालू झाल्यावर ज्या आवेशात जगातील मुसलमान देश पॅलेस्टाईनच्या, यासर अराफत आणि अल् फताह यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहायचे, तसे आता होतांना दिसत नाही. ५०-६० वर्षांपूर्वी विमानांचे अपहरण करूत ते प्रवाशांना ओलीस ठेवायचे आणि पॅलेस्टाईनी घातपाती लोकांना इस्रायलच्या कारागृहातून सोडवायचे. या सर्व कालखंडात जगातील सर्व मुसलमान देशांची संघटना ‘अल् फताह’च्या मागे ठामपणे उभी रहायची.
१. हमासचा उदय !
ज्या काळात यासर अराफत क्रियाशील होते, त्या काळात हमास नव्हती. त्या काळात इस्रायल आणि इजिप्त यांच्यात तडजोड झाली. यासर अराफत यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रदेशावर राज्य करता येत नव्हते. तेथे त्यांना स्थानिक पातळीवर एका प्राधिकरणासारखे स्थानिक व्यवहार करण्यासाठी एक देश म्हणून मान्यता मिळावी, अशी तडजोड झाली. अराफत यांनी त्यांच्या उतारवयात इस्रायलशी तडजोड केली. तेव्हा त्यांच्याहून कट्टर आणि आक्रमक असलेल्या पॅलेस्टाईनी लोकांनी ही तडजोड अमान्य केली. त्यातून हमास उदयाला आली. हमासचे लोक प्रामुख्याने गाझा पट्टीतील आहेत. तेथे निवडणुका झाल्या होत्या, त्याही हमास गटाने जिंकल्या होत्या. त्यांना इस्रायलशी कुठलीही तडजोड नको होती. त्या निवडणुकानंतर हमासचा राजकीय नेता हा पॅलेस्टाईन अॅथॉरिटीचा सर्वोच्च सत्ताधारी बनला. अनुमाने १० ते १५ वर्षांपूर्वी हमास आणि ‘पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी’ यांच्यात सतत मारामार्या होत होत्या. तेव्हा पॅलेस्टाईन अॅथॉरिटीतील अराफतचे निकटवर्तीय महंमद अब्बास त्यांच्याशी यांच्या मारामार्या होत होत्या. इस्रायलने तडजोड मान्य केली होती; म्हणून तो शांत होता; पण ही तडजोड हमासला मान्य नव्हती. त्यामुळे प्रत्येक वेळी हमासच्या मागे बहुतांश अरब देश उभे राहिले.
२. हमास-इस्रायल युद्धात अरब देश निष्क्रीय; पण भारतातील पुरोगाम्यांना पॅलेस्टाईनचा पुळका !
हा या वेळेचा मोठा भेद आहे. अनुमाने १०-१५ वर्षांनी इस्रायल-हमास संघर्ष उभा राहिला आहे आणि त्याच्यात अरब नसून केवळ पॅलेस्टाईनी आहेत. कुठलाही देश त्यांच्या मागे उजळ माथ्याने उभा रहाण्यास सिद्ध नाही. कतार त्यांना साहाय्य करत आहे; पण लॅबेनॉन आणि सीरिया हे देश सोडले, तर इराण त्यांना साहाय्य करत आहे. त्याखेरीज अन्य मुसलमान देश शक्य तितके मौन पाळून आहेत. अमेरिका, युरोप, कॅनडा अशा भागांत आश्रयाला गेलेले पॅलेस्टाईन लोक रस्त्यावर उतरले. तितक्याच मोठ्या संख्येने इस्रायलला समर्थन देण्यासाठी सहस्रो लोक रस्त्यावर आले. प्रथमच जगातील सर्व मुसलमान देश ठामपणे हमास किंवा पॅलेस्टाईन यांच्या पाठीशी उभे राहिलेले नाहीत. याउलट विचित्र, म्हणजे स्वत:ला ‘पुरोगामी’, ‘लिबरल’ (उदारमतवादी), ‘मानवतावादी’ असे म्हणवणारे; पण मुसलमान आणि अरब नसणारे लोक हमासच्या मागे ठामपणे उभे राहिले आहेत.
३. अरब देश हमासच्या पाठीशी उभे न रहाण्यामागील कारण !
हे सर्व आपोआप घडत आहे, असे म्हणणे मला योग्य वाटत नाही. ‘हे ज्या पद्धतीने घडत आहे, त्यावरून हे विकोपास जावे, असे ‘जिओ पॉलिटिक्स’ (भू राजकारण) चालू आहे’, असे मला वाटते. जे अरब देश संपन्न झाले आहेत, त्यांना आता जिहाद नको आहे. त्यामुळे त्यांनी हमासच्या पाठीशी उभे रहाण्यास पूर्णतः नकार दिला आहे. हमास-इस्रायल युद्ध चालू झाले, तेव्हा बहरीनसारख्या अरब देशाने सीरियाला धमकी दिली होती, ‘तुम्ही हमास-इस्रायल युद्धात नाक खुपसू नका, नाही तर तुम्हाला महागात पडेल.’ दुबईनेही यापासून हात झटकले आहेत. पॅलेस्टाईन किंवा हमास यांच्याहून इस्रायलचे समर्थन केलेला सौदी अरेबिया चूप बसला आहे. हे आपोआप घडले असेल का ? योगायोग हा की, ‘जी-२०’चे संमेलन झाल्यानंतर याचा भडका उडालेला आहे. (जी-२० म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.)
४. कॅनडातील खलिस्तानी आणि पाकिस्तानातील आतंकवादी यांच्या हत्यांशी हमास प्रकरणाचा संबंध !
नरेंद्र मोदी साडेनऊ वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान झाले. तेव्हापासून त्यांनी जागतिक व्यासपिठावर आतंकवादविरोधी सूत्र लावून धरले आहे. ‘या जगाला आतंकवादापासून मुक्त करणे, हा जगाचा कार्यक्रम असला पाहिजे. कुठल्याही जातीचा, धर्माचा, वंशाचा, विचारांचा आतंकवाद सहन होता कामा नये. आतंकवाद समूळ नष्ट केला पाहिजे आणि त्यासाठी जगाने एकत्र आले पाहिजे. यासाठी संयुक्त राष्ट्र, तसेच विविध जागतिक संघटना यांनी पुढाकार घेतला पाहिजे’, अशी भूमिका प्रत्येक जागतिक संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी मांडत आले आहेत. हमासच्या निमित्ताने त्याला प्रथम चालना मिळाली आहे. विविध व्यासपिठावरून हे बोलणे ठीक असते; पण जोपर्यंत त्याचा परिणाम दिसत नाही, तोपर्यंत अशा भाषणांना फारसा अर्थ नसतो. आता हळूहळू त्याचे परिणाम दिसत आहेत. हे हमासपुरते मर्यादित आहे, असे समजू नये. ‘जी-२०’ संपल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान मायदेशी पोचले आणि तेथे त्यांनी अचानक ‘कॅनडामध्ये मारला गेलेला खलिस्तानी निज्जर हा भारताच्या हेरखात्याकडूनच मारला गेला’, असा हेतूतः आरोप केला. तेव्हा भारताने कॅनडाशी संबंध बिघडू दिले; पण ‘आरोप सहन करणार नाही’, अशी ठाम भूमिका घेतली. त्या वेळी भारत एकटा पडला नाही. पाश्चात्त्य गोटातील समजला जाणारा कॅनडा हा भारताच्या लक्ष्यावर असतांना अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आदी देश हे भारताच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते, ‘आतंकवाद संपला पाहिजे.’ त्याचा न बोललेला भाग असा की, ‘जिथे मिळेल तेथे संपवला पाहिजे’, ‘मिळेल तेथे पोचून संपवला पाहिजे’, ‘बिळातून काढूनही मारला पाहिजे’, ही वाक्ये मोदी बोलत नाहीत; पण त्याचा गर्भितार्थ तोच असतो. ‘कॅनडात निज्जर किंवा अन्य मारला असेल, तसेच पाकिस्तानात असेच २-४ तोयबा किंवा मुजाहिदीन मारले असतील, तर भारताच्या विरोधात बोललेली भाषा भारत सहन करणार नाही’, अशी ठाम भूमिका मोदी यांनी घेतली. त्यानंतर हमास प्रकरण उद़्भवले आहे. त्यामुळे कॅनडातील खलिस्तान्यांची हत्या किंवा पाकमधील आतंकवाद्यांच्या संशयास्पद हत्या याच्याशी हमास प्रकरण जोडावे लागते.
५. आतंकवादाच्या संदर्भात जगाची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी !
या प्रकरणानंतर जगाचे दोन भाग पडलेले आपण पाहिले आहेत. २६ नोव्हेंबर २००८, तसेच पुलवामा आक्रमणाच्या प्रकरणापर्यंत जगातील सर्व देश भारताच्या समर्थनार्थ उभे राहिले नव्हते. मागील २-३ वर्षांतील हा सर्वांत मोठा भेद आहे. ‘आतंकवादाला पाठीशी घालणारे किंवा त्याविषयी मौन धारण करणारे यांचा एक आणि त्याच्या विरोधात ‘आतंकवाद निपटून काढला पाहिजे’, असा मोदी यांच्या मतानुसार बोलणारा दुसरा गट’, अशी जगाची विभागणी झाली आहे. वरकरणी हमास-इस्रायल युद्ध चालू आहे. ‘कॅनडात निज्जरची हत्या आणि पाकमध्ये आतंकवाद्यांच्या हत्या यांमध्ये इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ आणि भारताची गुप्तहेर संस्था ‘रॉ’ मिळून या कारवाया करत आहेत’, असा आरोप झाला होता.
आज ज्या प्रकारे हमास-इस्रायल युद्ध चालू आहे, यात अर्थातच मोसादची मोठी भूमिका आहे आणि भारत ठामपणे इस्रायलच्या बाजूने उभा आहे. ‘पॅलेस्टाईनविषयी भारताला सहानुभूती आहे; पण हमासविषयी काडीचीही सहानुभूती किंवा करुणा नाही’, ही अगदी स्वच्छ भूमिका भारताने घेतली आहे. त्यामुळे हमास-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पडद्याआड ज्या हालचाली चालू आहेत, त्यातून एक समोर येते की, मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत जागतिक पातळीवर भारताचे संबंध विकसित करतांना ‘भारत आतंकवादाच्या विरोधात ठामपणे उभा आहे, तसेच जो देश आतंकवादाचा नि:पात करत असेल, त्याच्या बाजूने भारत ठामपणे उभा राहील’, हे ठामपणे सांगितले. ‘जो देशाकडे वाकड्या नजरेने पाहील, त्यालाही सरळ केले जाईल’, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे. त्यामुळे हळूहळू जगातील लहान मोठ्या शेकडो देशांचे ध्रुवीकरण चालू झाले आहे.
हमास-इस्रायल युद्धाच्या निमित्ताने मोदी यांनी सर्वांत मोठा डाव खेळला असेल, तर जगाची दोन भागांमध्ये विभागणी केली आहे. एका बाजूला सरळ सरळ कुठल्याही स्वरूपाचा आतंकवाद मोडित काढायला उत्सुक असलेले आणि त्याला समर्थन देणारे देश आहेत अन् दुसर्या बाजूला आतंकवादाला समर्थन देणारे आणि पाठीशी घालणारे किंवा त्याविषयी मौन धारण करणारे एकटे पडलेले आहेत. त्याला मी ‘मोदी यांनी योजलेला डाव’, असे म्हणतो. मोदी हा ९ वर्षांतील असा राष्ट्रपुरुष आहे की, त्याने ‘कुठलाही आतंकवाद हा समूळ नष्ट केला पाहिजे’, ही भूमिका सातत्याने मांडली आहे. ‘आता हमासच्या निमित्ताने जो मोठा भडका उडालेला आहे, अशा वेळी बहुतांश मुसलमान देशही इस्रायलच्या समर्थनाला आले नसले, तरी इस्रायलच्या विरुद्धही बोलत नाहीत’, हे मोदींच्या खेळाचे मोठे यश म्हणता येईल. ही गोष्ट सोपी नाही. ज्या वेळी अरब युद्ध झाले, तेव्हा भारत हा सर्वांत मोठ्या लोकसंख्येचा देश असतांना मुसलमान देशांच्या संघटनेने अपमानित केले होते. ती संघटनाही हळूहळू भारताच्या गोटात आणून उभी करेपर्यंत मोदी यांनी मजल मारली आहे. त्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्या युद्धामध्ये मुसलमान देशांची संघटना असलेली ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन’ ही इस्रायलच्या विरोधात किंवा हमासच्या समर्थनार्थही बोलत नाही. त्यामुळे या खेळातील सर्वांत पहिला डाव कुठला असेल, तर ‘पॅलेस्टाईन आणि हमास यांच्यात स्पष्टपणे भेद केला पाहिजे’, हे मोदी यांनी तत्त्वत: यशस्वी करून दाखवले आहे. इस्रायल त्याच्यावर कारवाई करत आहे; पण मोदी यांनी सातत्याने मांडलेल्या भूमिकेची फलश्रुती आता बघत आहोत.’
– श्री. भाऊ तोरसेकर, वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक
(साभार : श्री. भाऊ तोरसेकर यांची ‘प्रतिपक्ष’ यू ट्यूब वाहिनी)