मुलीला मायेत न अडकवता साधना करण्यासाठी उद्युक्त करणारे पुणे येथील साधक दांपत्य श्री. नारायण शिरोडकर आणि सौ. नम्रता शिरोडकर !
श्री. नारायण शिरोडकर (वय ५९ वर्षे) आणि सौ. नम्रता शिरोडकर (वय ५२ वर्षे) हे दोघेही पुणे जिल्ह्यात अध्यात्मप्रसाराची सेवा करतात. दोघांनाही सेवेची तीव्र तळमळ आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असूनही त्यांनी ‘एकुलत्या एक मुलीने शिकून नोकरी करावी आणि त्यांना सांभाळावे’, अशी अपेक्षा केली नाही. त्यांनी ‘तिला पूर्णवेळ साधना करता यावी’, यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पाठवले. ‘असे आई-वडील मिळणे’, ही अत्यंत विरळा गोष्ट आहे. त्यांची मुलगी कु. प्रांजली नारायण शिरोडकर मागील एक वर्षापासून रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. तिला तिच्या आई-वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
आदर्श साधक पालक आणि त्यांची आदर्श साधिका मुलगी !‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीप्रमाणे हल्ली बहुतेक कुटुंबात एकमेकांचे पटत नाही. त्यांची भांडणे होतात. प्रांजलीने लिहिलेल्या तिच्या आई-वडिलांची गुणवैशिष्ट्ये वाचून आणि त्यांनी लिहिलेली तिची गुणवैशिष्ट्ये वाचून कलियुगातही असे आई-वडील आणि मुलगी असतात, हे लक्षात येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२०.२.२०२३) |
१. सनातन संस्थेच्या माध्यमातून आई-वडिलांच्या साधनेला आरंभ होणे
‘वर्ष २००० मध्ये एका ओळखीच्या काकूंनी बोलावल्यामुळे आई ‘सनातन संस्थे’च्या वतीने घेण्यात येणार्या सत्संगाला जाऊ लागली. एकदा तो सत्संग घेणार्या साधकाकडे आई-बाबा गेले होते. त्या साधकाने बाबांना सनातन-निर्मित ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा ग्रंथ वाचायला दिला. तो ग्रंथ वाचून वडिलांच्या मनात ‘सनातन संस्थे’विषयी ओढ निर्माण झाली. अशा प्रकारे आई-वडील दोघांचीही सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू झाली.
२. सौ. नम्रता शिरोडकर (कु. प्रांजलीची आई, वय ५२ वर्षे), विश्रांतवाडी, पुणे.
२ अ. व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून करणे : आई त्यांच्या व्यष्टी आढाव्याच्या सत्संगात सांगितलेले प्रयत्न मनापासून करते. तिला तिच्यातील स्वभावदोषांची जाणीव करून दिल्यावर ती लगेच कृतीच्या स्तरावर प्रयत्न करते.
२ आ. सेवेची तळमळ
१. आई साधकांच्या सेवेचे नियोजन तळमळीने करते.
२. साधक उपलब्ध नसतील, तेव्हा ती एकटी चालत सेवेला जाते. तेव्हा ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्या समवेत आहेत’, असा तिचा भाव असतो.
३. सेवेत असतांना तिला तहान आणि भूक यांची जाणीव नसते. सेवा पूर्ण झाल्यावरच ती घरी येते आणि घरी आल्यावर न थकता घरातील कामेही करते.
३. श्री. नारायण शिरोडकर (कु. प्रांजलीचे वडील, वय ५९ वर्षे), विश्रांतवाडी, पुणे.
३ अ. साधनेला आरंभ केल्यावर प्रथमच आलेली अनुभूती
३ अ १. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रवचन करतांना प्रवचन लिहिलेली अक्षरे दिसणे बंद होणे, मनोमन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर प्रवचन पूर्ण केले जाणे : वर्ष २००१ मध्ये वडिलांना गुरुपौर्णिमेनिमित्त प्रवचन घेण्याची सेवा मिळाली होती. त्यांनी प्रवचनाची सर्व सिद्धता केली होती. प्रवचनाच्या आरंभी ते वहीत लिहिलेले प्रवचन पाहून बोलत होते; परंतु काही वेळाने त्यांना वहीतील अक्षरे दिसेनाशी झाली. तेव्हा त्यांनी मनोमन गुरुदेवांना प्रार्थना केली आणि प्रवचन केले.
३ अ २. प्रवचन झाल्यावर ‘सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच प्रवचन घेतले’, असे लक्षात येणे : प्रवचन झाल्यावर श्रोते वडिलांच्या पायाला हात लावून नमस्कार करू लागले. तेव्हा ‘श्रोते असे का करत आहेत ?’, हे त्यांच्या लक्षात येत नव्हते आणि त्यांना ‘ते प्रवचनात काय बोलले ?’, हेही आठवत नव्हते. या अनुभूतीवरून ‘गुरुदेवांनी सूक्ष्मातून साहाय्य करून प्रवचन घेतले’, असे त्यांच्या लक्षात आले.
साधनेला आरंभ केल्यावर वडिलांना ही पहिलीच अनुभूती आली होती. त्यामुळे त्यांची साधना आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावरील श्रद्धा दृढ झाली.
३ आ. इतरांशी जवळीक करणे : बाबांची समाजातील अनेक लोकांशी जवळीक आहे. समाजातील लोक त्यांच्या अडचणी मोकळेपणाने बाबांना सांगतात. तेव्हा बाबा त्यांना ‘साधना का करायला हवी ?’, हे समजावून सांगतात. त्यामुळे समाजातील त्यांचे परिचितही नामजप करू लागले आहेत.
३ इ. स्वतःच्या वागण्यातून मुलीवर बिंबवलेले साधनेचे महत्त्व !
१. सेवेत व्यस्त असल्यामुळे कधी माझा अभ्यास झाला नाही आणि अल्प गुण मिळाले, तरी बाबा मला कधीच रागावले नाहीत; पण सेवा नसतांना मी अभ्यास न केल्यास ते मला रागावत असत.
२. आमची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असूनही त्यांनी माझ्या सेवेसाठी आवश्यक असलेला भ्रमणसंगणक मला घेऊन दिला.
३. ‘तू साधना करून संत हो. त्यातच आम्हाला सर्वकाही मिळेल’, असे ते मला नेहमी सांगतात.
३ ई. सेवेची तळमळ
३ ई १. दमून आल्यावरही सेवेला ‘नाही’ न म्हणता सांगितलेली सेवा लगेच करणे : काही वेळा दिवसभर काम करून दमून घरी आल्यावर साधकांचा बाबांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे पोचवण्याच्या सेवेसाठी भ्रमणभाष येतो. तेव्हा ते कितीही दमलेले असले, तरी सेवेला कधीच ‘नाही’ म्हणत नाहीत. दैनिकाचे गठ्ठे पोचवण्याची सेवा करायला गेल्यावर ते रात्री १२ – १ वाजता घरी येतात.
३ ई २. सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास असल्यामुळे वडिलांची संपर्कसेवा चांगली होणे : बाबांचा सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळे जिज्ञासूंना संपर्क करतांना ते जिज्ञासूंनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन करतात. त्यामुळे त्यांची संपर्कसेवा चांगली होते.
३ ई ३. दुःखाच्या प्रसंगातही स्थिर राहून सेवा करणे : वर्ष २०२१ मध्ये दिवाळीच्या आधी बाबांकडे आकाशकंदिल बनवायची सेवा होती. बाबा ती सेवा करत असतांना संध्याकाळी माझ्या काकांचा बाबांना भ्रमणभाष आला. त्यांनी बाबांना ‘आईचे (बाबांच्या आईचे) निधन झाले आहे’, असे सांगितले. भ्रमणभाषवर बोलून झाल्यावर त्यांनी मला आणि आईला ‘आईचे निधन झाले असून ‘आपण ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करूया’, असे शांतपणे सांगितले. ‘आजीचे निधन झाल्याचे समजल्यावरही ‘बाबा इतके स्थिर कसे राहू शकतात ?’, याचे मला नवल वाटले. आजीच्या मृत्यूनंतरच्या विधींना जाण्यापूर्वी १० – १२ दिवसांच्या अवधीत बाबांनी एकट्याने १५० आकाशकंदिल बनवले. याचे सर्वच साधकांना आश्चर्य वाटले. केवळ गुरुकृपेनेच ते स्थिर राहून सेवा करू शकले.
३ उ. अल्प अहं : मी रामनाथी आश्रमात येण्यासाठी घरून निघतांना आई-बाबांना म्हणाले, ‘‘मी लवकर परत येणार नाही. त्यामुळे तुम्ही मला घरी बोलावू नका.’’ तेव्हा बाबा मला म्हणाले, ‘‘माझ्याकडून काही चुकले असेल, तर क्षमा कर.’’ आतापर्यंत त्यांनी माझी कधीच क्षमा मागितली नव्हती. या प्रसंगातून त्यांच्यातील अल्प अहं आणि भाव माझ्या लक्षात आला.
४. आई-वडिलांची सामायिक गुणवैशिष्ट्ये
४ अ. आई-वडील दोघांनाही लहानपणापासून देवाची ओढ असणे : माझ्या आई-बाबांना त्यांच्या लहानपणासून देवाची ओढ आहे. आई देवळात जात असे आणि उपवास करत असे, तर बाबा काही संतांकडे जाऊन जिज्ञासेने शंकानिरसन करून घेत आणि ध्यानधारणा करत असत.
४ आ. चांगल्या वस्तू किंवा कपडे यांची आसक्ती नसणे : दोघांनाही मायेची आसक्ती नाही. दोघांनाही आपल्याकडे ‘चांगले कपडे, वस्तू आणि जेवण हवे’, असे वाटत नाही. दोघांकडे मोजकेच कपडे आहेत. मी त्यांना नवीन कपडे घेण्यासाठी विचारल्यावर ते म्हणतात, ‘‘गुरुदेवांकडेही मोजकेच कपडे आहेत. आपणही तसेच असायला हवे. आवश्यक तेवढेच कपडे घ्यायला हवे.’’
४ इ. परिस्थिती स्वीकारणे : माझ्या लहान बहिणीचे ती ५ वर्षांची असतांना आजारपणामुळे निधन झाले. बहिणीच्या निधनाच्या दिवशी सकाळपासून आई-बाबांना ‘आज काहीतरी विपरीत घडणार’, असे जाणवत होते. त्यामुळे त्या दिवशी बाबा कामाला न जाता घरीच थांबले होते. बहिणीचे निधन झाल्यावर बाबा स्थिर होते. आईनेही काही दिवसांनी परिस्थिती स्वीकारली. ‘गुरुदेवांनी मुलीला होणार्या त्रासापासून मुक्त केले असून तिला चांगली गती मिळेल’, असा त्यांचा भाव असतो.
४ ई. महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा साधनेला प्राधान्य देणे
१. दोघांनाही वाटायचे, ‘मी शिक्षणापेक्षा साधनेलाच प्राधान्य द्यावे.’ काही वेळा मी महाविद्यालयात न जाता सेवेला जात असे. तेव्हा आई-बाबा कधीच मला ‘सेवेला जाऊ नको’, असे म्हणायचे नाहीत.
२. मी सेवेनिमित्त कुठे बाहेर गेल्यावर ते कधीच मला भ्रमणभाष करून ‘घरी कधी येणार ?’, असे विचारायचे नाहीत; पण मी वैयक्तिक कामानिमित्त किंवा मैत्रिणींसह बाहेर गेल्यावर ते मला अनेकदा भ्रमणभाष करून घरी परत येण्याविषयी विचारत असत.
३. ‘मुलीने नोकरी करावी आणि आपल्याला सांभाळावे’, अशी त्यांची अपेक्षा नाही. दोघेही ‘पुढे आपले कसे होईल ?’, असा विचार करत नाहीत. माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मला पूर्णवेळ साधनेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पाठवले.
४ उ. सेवेची तळमळ
४ उ १. साधनेच्या आरंभीच्या काळात दोघांनीही ‘ग्रंथप्रदर्शन लावणे, सात्त्विक उत्पादने वितरण करणे आणि प्रचारातील सेवा’, अशा अनेक सेवा केल्या आहेत.
४ उ २. सेवेच्या तळमळीमुळे वडिलांच्या जेवण-खाण्याची काळजी न करणारी आई आणि स्वयंपाक करायला जमले नाही, तरी त्याविषयी आईला काही न बोलणारे वडील ! : साधकांनी काही सेवेनिमित्त आईला बोलावल्यावर ती लगेच जाते. ‘बाबांच्या जेवणाचे कसे होईल ?’, असा विचार न करता ‘देव त्यांना बघेल’, असा विचार करते. बाबाही आईला ‘तू सेवेला जाऊ नकोस किंवा लवकर परत ये’, असे कधीच सांगत नाहीत. कधी कामावरून दमून आले, तर केवळ पाणी पिऊन झोपतात; पण आईला काही सांगत नाहीत.
४ उ ३. मुलीशी बोलण्यापेक्षा सेवेला प्राधान्य देणे : आई-बाबा सेवेत व्यस्त असतांना मी त्यांना भ्रमणभाष केल्यावर ते ‘मी सेवेत आहे’, असे सांगून लगेच भ्रमणभाष बंद करतात. प्रत्यक्षात मी त्यांना ५- ६ दिवसांनी भ्रमणभाष केलेला असूनही ते माझ्याशी बोलण्यापेक्षा सेवेला प्राधान्य देतात.
४ ऊ. ‘मुलीची साधना चांगली व्हावी’, अशी तळमळ असणे
४ ऊ १. नातेवाइकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे : मी मागील एक वर्षापासून रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. या कालावधीत घरी कुणी पाहुणे, नातेवाईक आले, तर ते तारतम्याने ‘मी कुठे आहे आणि काय करते ?’, हे सांगतात. काही वेळा नातेवाईक सांगतात, ‘‘मुलीला चांगले शिकून नोकरी करायला सांगा.’’ आई-बाबा त्यांना ‘‘हो’’, असे सांगून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात.
४ ऊ २. ‘तुझी सेवा चांगली कर’, असे सांगणे : रामनाथी येथे गेल्यावर आधी मी प्रतिदिन आई-बाबांना भ्रमणभाष करायचे. तेव्हा आई म्हणायची, ‘‘प्रतिदिन भ्रमणभाष करू नकोस. प्रतिदिन काय बोलणार ? तू तुझी सेवा चांगली कर. कधीतरी भ्रमणभाष कर.
४ ए. गुरुदेवांवरील अपार श्रद्धा !
४ ए १. मुलीला पूर्णवेळ साधना करण्यास प्रवृत्त करणे : माझी १२ वीची परीक्षा झाल्यानंतर आई-बाबा मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी सांगायचे. माझ्या मनात यायचे, ‘मी पूर्णवेळ साधना करू लागले, तर आई-बाबांना कोण बघणार ?’ हेे मी बाबांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘आम्हाला बघणारी तू कोण ?’’ त्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘सर्वकाही गुरुदेवच बघणार आहेत. त्यांनीच आतापर्यंत आम्हाला सांभाळले आहे आणि पुढेही तेच सांभाळणार आहेत. त्यामुळे ‘मी कशाला काळजी करू ?’ त्यानंतर माझा पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय झाला. याविषयी मी आई-बाबांना सांगितल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला.
४ ए २. कुठलीही काळजी न करता ‘गुरुदेव पहातील’, असा भाव असणे : घरात काही आर्थिक अडचणी आल्यास ‘गुरुदेव आवश्यक ते देतील’, असा दोघांचाही भाव असतो. कोरोनाच्या काळात वडिलांना कुठेच काम करणे शक्य नसल्यामुळे ‘कसे होईल ?’, असा मला प्रश्न पडला; परंतु दोघांचाही ‘गुरुदेवांनी आतापर्यंत काळजी घेतली आहे आणि या पुढेही घेतील’, असा भाव होता. त्यामुळे परिचितांकडून वडिलांना कामे मिळायची.
गुरुकृपा आणि आई-बाबांची तळमळ यांमुळे मी रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी आई-बाबांची साधना व्हावी’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे आणि ‘गुरुमाऊलीने साधक आई-वडील दिले’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. प्रांजली शिरोडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२२)